मेळघाटच्या जंगलात छावा मृतावस्थेत आढळला; अधिकारी घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 04:35 PM2020-07-19T16:35:21+5:302020-07-19T16:35:34+5:30

चौराकुंड परिक्षेत्रातील घटना; रानडुकराचीही शिकार 

cub found dead in the forest of Melghat | मेळघाटच्या जंगलात छावा मृतावस्थेत आढळला; अधिकारी घटनास्थळी

मेळघाटच्या जंगलात छावा मृतावस्थेत आढळला; अधिकारी घटनास्थळी

googlenewsNext

अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सिपना वन्यजीव विभागातील चौराकुंड परिक्षेत्रातील जंगलात शनिवारी वन कर्मचाऱ्याना गस्तीदरम्यान मृत छाव्याचे अवयव आढळून आले. तर एका मोठ्या रानडुकराची शिकार वन्यप्राण्याने केल्याचेही त्याचवेळी उघड झाले. या संपूर्ण घटनेच्या तपासासाठी व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी जंगलात तळ ठोकून आहेत. मृत छावा मादा आहे. 

चौराकुंड वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या उत्तर चौराकुंड नियत क्षेत्रात कक्ष क्रमांक ५७९ मध्ये वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना वाघाच्या छाव्याचा तुटलेला मागील पायाचा पंजा आढळून आला. पुढे जाताच त्यांना काही अंतरावर एका मोठ्या रानडुकराची शिकार झाल्याचे निदर्शनात आले. वाघाच्या छाव्याचे  इतर अवयव शोधत असताना शंभर मीटर अंतरावर त्याचे डोके व पुढचे पाय आढळून आले, तर मागचे शरीर एखाद्या वन्यप्राण्याने खाल्ल्याचे प्रथमदर्शी उघड झाले आहे. छाव्याच्या मानेवर वन्यप्राण्यांच्या दाताचे निशाण आढळून आले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे  अप्पर प्रधान संरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील, वनपरिक्षेत्राधिकारी निर्मळ व व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी तपास करत आहेत. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी पोहोचले आहेत.

अकोट येथून आणला डॉग स्कॉड
वाघाच्या छाव्याचा पंजा जंगलात आढळून येताच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाºयांनी अकोट वन्यजीव विभागातील प्रशिक्षित डॉग स्कॉडला पाचारण केले आहे. वाघाच्या बछड्यावर  कुठल्या वन्यप्राण्याने हल्ला केला व त्याचे अवयव धडावेगळे केले, या दिशेने तपास सुरू करण्यात आला आहे. 
दरम्यान, रानडुकराची शिकार केल्याचे उघड झाल्यानंतर बछड्याच्या मृत्यूने घायाळ झालेली वाघीण परिसरातच फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
 

Web Title: cub found dead in the forest of Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.