अंजनगावात अज्ञात रोगाने कावळे, बगळ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST2021-03-01T04:15:49+5:302021-03-01T04:15:49+5:30
बर्ड फ्लूची भीती : नमुने अमरावतीला अंजनगाव सुर्जी : स्थानिक अंजनगाव-आकोट रोड वरील हिंदू स्मशानभूमीमध्ये रविवारी काही कावळे व ...

अंजनगावात अज्ञात रोगाने कावळे, बगळ्यांचा मृत्यू
बर्ड फ्लूची भीती : नमुने अमरावतीला
अंजनगाव सुर्जी : स्थानिक अंजनगाव-आकोट रोड वरील हिंदू स्मशानभूमीमध्ये रविवारी काही कावळे व बगळे मरण पावल्याचे आढळून आले. दरम्यान, अमरावती तालुक्यातील अंजनगाव बारीलगतच्या पोल्ट्री फार्ममधील ३३ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अंजनगावातही बर्ड फ्लूची भीती व्यक्त होत आहे.
काही कावळे आणि एक बगळा मृतावस्थेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर डोंगरे यांना मिळताच त्यांनी याबाबत महसूलला माहिती दिली. लागलीच तहसीलदार वैशाख वाहूरवाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर डोंगरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शरद झोंबाडे, डॉ. शरद बोचे व सहकारी जावेद यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये चार-पाच कावळ्यांचा तसेच एक बगळ्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. पुढील तपासणीकरिता ते पक्षी अमरावती येथे जिल्हा पशु सर्वचिकित्सालयात पाठविण्यात आले आहेत. त्यांच्या तपासणी अहवालानंतर सदर पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. झोंबाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
----------