तळीरामांची दुकानांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:01 IST2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:01:24+5:30
घरपोच दारू सुविधेचा मंगळवारी दुसरा दिवस होता. पोलीस, एक्साईजचे अधिकारी दारू विक्री दुकानांवर लक्ष ठेवून होते. घरपोच दारू ही आॅनलाईन नोंदणीनंतरच मिळेल, असे आदेशात स्पष्ट नमूद आहे. मात्र, तळीरामांना केवळ दारू हवी आहे, परवाना वगैरे याचे काहीही घेणेदेणे नाही, अशी दुकानांवर सकाळी १० वाजतापूर्वीच गर्दी करण्यात आली होती.

तळीरामांची दुकानांवर गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारपासून घरपोच दारूची सुविधा सुरू करण्यात आली असली तरी मद्यासाठी तळीरामांची दुकानांवर तुफान गर्दी चालविली आहे. अमरावती महानगरात जवळपास वाईन शॉप, बिअर शॅपीवर हे दृश्य मंगळवारी अनुभवता आले. दारू पिण्याचा परवाना असलेल्या व्यक्तीलाच घरपोच दारू मिळेल, अशी नियमावली आहे. तथापि, बहुतांश तळीरामांनी थेट दुकानातून दारू विकत घेण्यासाठी रस्सीखेच केली.
घरपोच दारू सुविधेचा मंगळवारी दुसरा दिवस होता. पोलीस, एक्साईजचे अधिकारी दारू विक्री दुकानांवर लक्ष ठेवून होते. घरपोच दारू ही आॅनलाईन नोंदणीनंतरच मिळेल, असे आदेशात स्पष्ट नमूद आहे. मात्र, तळीरामांना केवळ दारू हवी आहे, परवाना वगैरे याचे काहीही घेणेदेणे नाही, अशी दुकानांवर सकाळी १० वाजतापूर्वीच गर्दी करण्यात आली होती. दारू विक्री दुकानांच्या बाहेर घरपोच दारू सुविधांसाठी मोबाइल क्रमांक, व्हाट्अप, मॅसेज, फोन नंबर देण्यात आले आहेत. मंगळवारपासून १८ वाईन शॉप, १६ बिअर शॉपीतून आॅनलाईन नोंदणीअंती घरपोच दारू मिळविता येईल, असे एक्साईजने स्पष्ट केले आहे.
नवाथेनगर, कॅम्प, रूक्मिणीनगर, कंवरनगर, सहकार भुवनसमोर, राजापेठ, गाडगेनगर या भागातील दारू दुकानांवर प्रचंड गर्दी करण्यात झाल्याची माहिती आहे. थेट दारू विकत मिळणार नाही, असे निश्चित असताना तरिही तळीरामांनी गर्दी केल्यामुळे विक्रेत्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरपोच दारू सुविधेचे नियोजन हाताळण्यास प्रशासन फेल झाल्याचे चित्र आहे.
परमीट रूममधून सीलबंद दारू विक्री
परमीट रूम धारकांना (एफएल-३) बिअर, दारू सीलबंद विकता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्यांच्याकडे साठा शिल्लक आहे, त्यांना मद्यसाठा संपेपर्यंत विक्री करण्यास परवानगी असल्याचे गृहविभागाचे कार्यासन अधिकारी सु.श. यादव यांनी १९ मे रोजी आदेशानुसार स्पष्ट केले आहे.
दुकानांसमोर दारू विकत मिळणार नाही, असे ठळकपणे फलक लावण्यात येणार आहे. घरपोच दारू सुविधेसाठी आॅनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. आता गर्दी कमी करण्यासाठी ई-टोकन प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार आहे. परवानाशिवाय कुणालाही दारू मिळणार नाही.
- राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अमरावती