पीक विमा शेतकऱ्यांसाठी नव्हे, अंबानींसाठी
By Admin | Updated: May 28, 2017 00:05 IST2017-05-28T00:05:54+5:302017-05-28T00:05:54+5:30
‘अच्छे दिन येणार’ असे केंद्रातील भाजपा सरकार सर्वसामान्यांसह, शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात उद्योगपतींसी यांचे हितसंबंध जुळलेले आहेत.

पीक विमा शेतकऱ्यांसाठी नव्हे, अंबानींसाठी
वीरेंद्र जगताप : मोदी सरकारच्या अच्छे दिनाची काँग्रेसद्वारा पुण्यतिथी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘अच्छे दिन येणार’ असे केंद्रातील भाजपा सरकार सर्वसामान्यांसह, शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात उद्योगपतींसी यांचे हितसंबंध जुळलेले आहेत. पंतप्रधान पीक विम्यासाठी १८ हजार कोटींचा हिस्सा शेतकऱ्यांनी भरणा केला. प्रत्यक्षात त्यांच्या पदरी दोन हजार कोटीच पडले. हा विमा शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर अंबानींसाठी असल्याचा घणाघाती आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.
केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झालीत. मात्र सर्वसामान्यांच्या पदरी ‘बुरे दिन’ आलेत. या सरकारद्वारा सत्तेपूर्वी व सत्तेत आल्यावर आश्वासनांची पूर्तता नाही. केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा केंद्र शासनाच्या ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी करण्यात आली.
आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोप आ.जगताप यांनी केला. प्रत्यक्षात १० हजार रूपये क्विंटल असलेली तूर आता मातीमोल दराने विकली जात आहे. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा सरचिटणीस प्रकाश काळबांडे, भैयासाहेब मेटकर, प्रल्हादराव ठाकरे आदी उपस्थित होते. अमरावती शहर काँग्रेसनेही पत्रकार परिषदेदरम्यान मोदी सरकारचा निषेध केला.
मोदी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला हारार्पण
सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारचे प्रतिकात्मक बॅनर तयार करून जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या बॅनरला हारार्पण करून पुण्यतिथी साजरी केली आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.