क्रौंच पक्ष्यांनी केलाय विक्रम!
By Admin | Updated: February 1, 2015 22:48 IST2015-02-01T22:48:41+5:302015-02-01T22:48:41+5:30
दयार्पूर तालुक्यात तब्बल ९५७ च्या विक्रमी संख्येत क्रौंच पक्षी दिशा फाऊंडेशनचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांना आढळून आलेत. इतक्या मोठ्या संख्येत क्रौंच पक्ष्यांची

क्रौंच पक्ष्यांनी केलाय विक्रम!
अमरावती : दयार्पूर तालुक्यात तब्बल ९५७ च्या विक्रमी संख्येत क्रौंच पक्षी दिशा फाऊंडेशनचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांना आढळून आलेत. इतक्या मोठ्या संख्येत क्रौंच पक्ष्यांची महाराष्ट्रात पहिल्यांदा तर भारत व आशियात दुसरी नोंद करण्यात आली आहे.
दॅमझील के्रन नावाने ओळखला जाणारा हा पक्षी आपल्या भागात युरेशिया, सायबेरिया, डेन्मार्क, जर्मनी, ग्रीस व रोमानिया या देशातून स्थलांतर करून येतो. यांचे स्थलांतर सगळ्यात कठीण मानले जाते. आॅगस्ट ते सप्टेबर महिन्यात हे एकत्र येऊन समूहाने उडाण भरतात. साधारणत: १६ हजार ते २६ हजार फूट उंचीवरून उडत हिमालय पर्वतरांगा पार करून आपल्या भागात येतात.
मार्च महिनादरम्यान ते परतीच्या प्रवासाला लागतात. हे पक्षी नेहमी समूहाने राहत असून यांचे स्थलांतर पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. डोक्यावर व पोटावर लांब काळ्या रंगाची पिसे व झुपकेदार काळ्या रंगाचे शेपूट आणि सर्व शरीर राखाडी रंगाचे असून हे दिसायला अतिशय सुंदर असतात.
गर्द लाल रंगाचा डोळ्यामुळे आकर्षक दिसतात. क्रेन प्रकारातील हा सगळ्यात लहान क्रेन पक्षी असून यांचा पंखांचा विस्तार १५५ ते १८० सेमी असतो. अमरावती जिल्ह्यातील तलावावर क्रौंचचे आगमन हे समृध्द पर्यावरणाचे प्रतिक असल्याचे मत पर्यावरण प्रेमी व पक्षी मित्राचे आहे. (प्रतिनिधी)