सुवर्ण कारागिरांवर उपासमारीचे संकट
By Admin | Updated: March 15, 2016 00:33 IST2016-03-15T00:33:56+5:302016-03-15T00:33:56+5:30
सराफा बाजारात दररोज होणारी कोट्यवधीची उलाढाल बेमुदत संपामुळे ठप्प झाली आहे.

सुवर्ण कारागिरांवर उपासमारीचे संकट
व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान : तोडगा निघण्याची प्रतीक्षा
अमरावती : सराफा बाजारात दररोज होणारी कोट्यवधीची उलाढाल बेमुदत संपामुळे ठप्प झाली आहे. व्यापाऱ्यांना कोट्यवधींचे नुकनास सहन करावे लागत आहे. मात्र, या संपाचा सर्वाधिक फटका सुवर्ण कारागिरांना बसला आहे. सराफा बंदमुळे कारागिरांचा रोजगार पूर्णपणे बुडाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हा बेमुदत संप कधी संपणार, असा प्रश्न कारागिरांसह त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावत आहे.
सोन्यावरील उत्पादन शुल्कात एक टक्का आणि अबकारी करात झालेल्या वाढीमुळे सराफा व्यावसायिकांवर कराचा बोझा वाढला आहे. शासनाने वाढीव कर मागे घ्यावा, या मागणीसाठी देशभरातील सराफा व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामध्ये अमरावती शहरातील सराफा व्यावसियाकांचाही सहभाग आहे. जिल्ह्यात जवळपास २ हजार सुवर्णकारागीर असून ते २०० ते ५०० रुपयापर्यंत रोजगार मिळवितात. त्या रोजदारीतून ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. याच व्यवसायावर सुवर्ण कारांगिरांच्या जीवनाचा गाडा चालतो. मात्र, मागील १० दिवसांपासून सराफा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे कारागिरांच्या रोंजदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज हाती आलेले काम करून पैसे कमावणाऱ्या कारागिरांचा अचानक रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना कुटुंबीयांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न भेडसावत आहे. सोन्या-चांदीचा व्यवसाय करणारे व्यापारी वर्ग हे श्रीमंत आहेत, मात्र, सुवर्ण कारागिरांचे हातावर कमावणे असल्यामुळे त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात जवळपास २ हजार कारागीर विविध सराफा व्यावसायिकांकडे काम करतात. दररोज २ ते ५ ग्रॅम सोन्याचे काम करून ते रोजगार मिळवितात. मात्र, या बंदमुळे सुवर्णकारागिरांचा दररोज सुमारे २५ लाख रुपयांचा रोजगार बुडत असल्याचे सुवर्णकार संघाचे म्हणणे आहे. गेल्या १० दिवसात व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे, त्यातच कारागिरांवरही उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
सुवर्णकारागिरांना या बंदचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे, हे खरे, मात्र, रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- अजय तिनखेडे,
अध्यक्ष, जिल्हा सुवर्णकार संघ.
सराफा बंद असल्यामुळे पैशांची कमतरता भासत आहे. जवळ होता तेवढा पैसा आतापर्यंत कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहात गेला. आणखी काही दिवस सराफा व्यवसाय बंद राहिल्यास आमच्यावर उपासमारीचीच वेळ येणार आहे.
- संदीप बहाळ,
सुवर्ण कारागीर.