गंगाप्रसाद जयस्वाल यांच्याविरूध्द फौजदारी ?

By Admin | Updated: May 14, 2015 00:08 IST2015-05-14T00:08:09+5:302015-05-14T00:08:09+5:30

महापालिकेतील तत्कालीन बाजार व परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी संकुलातील गाळेधारकांसोबत ...

Criminalization against Gangapadhas Jaiswal? | गंगाप्रसाद जयस्वाल यांच्याविरूध्द फौजदारी ?

गंगाप्रसाद जयस्वाल यांच्याविरूध्द फौजदारी ?

अमरावती : महापालिकेतील तत्कालीन बाजार व परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी संकुलातील गाळेधारकांसोबत परस्पर करारनामे करुन प्रशासनाची दिशाभूल, प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई प्रस्तावित आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्या सेवानिवृत्तीची रक्कम रोखण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या ‘सर्चिंग’मध्ये नवीन घबाड उघड झाले आहे. अतिक्रमण आणि बाजार परवाना विभागाचा कारभार चालविणारे तत्कालीन अधिकारी गंगाप्रसाद जयस्वाल यांनी प्रशासन किंवा सभागृहाची परवानगी न घेता करारनामा संपण्यापूर्वीच महापालिका संकुलातील गाळेधारकांसोबत परस्पर करारनामे करुन लाखोंची माया जमविल्याचे सत्य समोर आले आहे. महापालिकेने तहसील कार्यालयानजिक बीओटी तत्वावर खत्री कॉम्प्लेक्स निर्माण केले आहे. या संकुलात २१३ गाळे असून कंत्राटदारासोबतचा करार सन २०१८ मध्ये संपुष्टात येणार आहे. परंतु जयस्वाल यांनी प्रशासनाला कोेणतीही माहिती न देता येथील गाळेधारकांसोबत २५ वर्षांसाठी करारनामा केल्याची बाब उघडकीस आली आहे. या संकुलात ५० गाळे रिक्त असताना ते परस्पर वाटप करण्यात आले. या नियमबाह्य प्रकाराची गंभीर दखल घेत आयुक्त गुडेवार यांनी उपायुक्त चंदन पाटील यांना प्राथमिक चौकशीनंतर गंगाप्रसाद जयस्वाल यांच्या विरुद्ध फौजदारी कारवाईचे निर्देश दिलेत. प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही जयस्वाल उपलब्ध झाले नाही.

बँक खाती गोठविण्याचा निर्णय : संकुलातील गाळेधारकांसोबत केले परस्पर करारनामे
जयस्वाल यांच्या संपत्तीला टाळे
तत्कालीन बाजार व परवाना अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी संकुलात गैरप्रकार केल्याबद्दल प्रथम फौजदारी कारवाई करण्याचे प्रस्तावित असले तरी आयुक्तांनी त्यांची अचल संपत्ती, बँक खाती गोठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. महापालिकेचा कारभार सतत चर्चेत येत असताना जयस्वाल यांच्या कारनाम्याने अधिकारीदेखील अवाक् झाले आहेत.

सेवानिवृत्तीची रक्कम रोखली
गंगाप्रसाद जयस्वाल यांनी अपहार केल्याप्रकरणी लेखाविभागाला सेवानिवृत्तीची रक्कम रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लेखापाल शैलेंद्र गोस्वामी यांनी ही फाईल थांबविली आहे. जयस्वाल यांना सेवानिवृत्तीचे आठ ते नऊ लाख रुपये देणे बाकी होते. परंतु आयुक्तांच्या आदेशाने जयस्वाल यांची फाईल थांबली आहे.

शहरात तब्बल १६ संकुलात गैरप्रकार झाल्याची तक्रार यापूर्वी करण्यात आली आहे. गंगाप्रसाद जयस्वाल यांनी प्रचंड आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याची सखोल चौकशी केल्यास बरीच तथ्ये बाहेर येतील.
- प्रवीण हरमकर, विरोधी पक्षनेता.

खत्री कॉम्प्लेक्समध्ये परस्पर गाळे वाटपाचे करारनामे केल्याचे स्पष्ट झाले आहे. जयस्वाल यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश आयुक्तांचे आहेत. लीज संपण्यापूर्वीच करारनामे केले गेले.
- चंदन पाटील, उपायुक्त, महापालिका.

Web Title: Criminalization against Gangapadhas Jaiswal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.