उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2017 00:14 IST2017-01-05T00:14:51+5:302017-01-05T00:14:51+5:30
जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन (ग्रामीण) मार्फत जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायती पहिल्या टप्यात हगणदारी मुक्त करण्यात येणार आहे.

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हे
जिल्हा परिषद : ५८९ ग्रामपंचायतीत १६ जानेवारीपासून अंमलबजावणी
अमरावती : जिल्हा परिषद पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन (ग्रामीण) मार्फत जिल्ह्यातील ४१४ ग्रामपंचायती पहिल्या टप्यात हगणदारी मुक्त करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने येत्या १६ जानेवारीपासून जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन कक्ष व सर्व विभागाच्या समन्वयातून धडक मोहीम राबविली जाणार आहे.
जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींपैकी ४१४ ग्रामपंचायतीमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. सध्यास्थितीत २५० ग्रामपंचायती हगणदारी मुक्त झाल्या आहेत. तर उर्वरित ५८९ ग्रामपंचायती मार्च २०१८ पूर्वी हगणदारी मुक्त करण्यासाठी गावागावांत जनजागृतीचे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. परंतु अद्यापही बऱ्याच गावातील ग्रामस्थांमध्ये अपेक्षित असलेला बदल दिसून येत नाही. त्यामुळे गृहविभागाच्या २००८-०९ मधील परिपत्रकानुसार उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तीवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५ ते ११७ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आहेत. याशिवाय संबंधित दोषी व्यक्तीला सहा महिन्याचा कारावास व प्रति दिवस बाराशे रूपये दंड आकारण्याची तरतूद आहे.यानुसार १६ जानेवारी पासून उघडयावर शौचास बसणाऱ्या विरोधात धडक कारवाईची मोहीम जिल्हाभरात राबविली जाणार आहे. स्वच्छता मिशन अभियान जिल्हा परिषदेत गांभीर्याने राबविले जात आहे. (प्रतिनिधी)
१४ पथके देणार आकस्मिक भेट
जिल्हास्तरावरून गाव पातळीवर पहाटे आकस्मिक भेटीसाठी जिल्हा परिषदेतील सर्व खातेप्रमुखांच्या अध्यक्षतेखाली १४ पथकांचे गठन केले आहे. या मोहीमेसाठी सीईओ किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पाणी पुरवठा व स्वच्छ भारत मिशन विभागाचे डेप्युटी सीईओ संजय इंगळे व त्याचे सहकारी या मोहीमेचे नियोजन करत आहेत.