तोडफोड प्रकरणात नातेवाईकांविरुद्द गुन्हे
By Admin | Updated: October 15, 2016 00:19 IST2016-10-15T00:19:47+5:302016-10-15T00:19:47+5:30
उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.

तोडफोड प्रकरणात नातेवाईकांविरुद्द गुन्हे
कल्याणनगरातील घटना : नातेवाईकांचा रोष
अमरावती: उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी कल्याण नगर चौकातील सिटी मल्टिस्पेशालिटी अॅन्ड क्रिटिकल केअर सेंटर रुग्णालयात घडली. याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी १० ते १२ नातेवाईकांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहे.
डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे प्रशांत प्रकाश खडसे यांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी मृताच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्तांना दिले. ९ आॅक्टोबर रोजी प्रशांत खडसे यांना विषबाधा झालेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय तज्ज्ञ पंकज बागडे हे रुग्णावर उपचार करीत होते. मात्र, गुरुवारी दुपारी प्रशांतचा मृत्यू झाला. बिलाच्या कारणावरून नातेवाईकांनी डॉक्टरांशी वाद घातला व सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास १० ते १५ नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. हा वाद विकोपाला गेल्याने नातेवाईक व डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली. संतप्त नातेवाईकांनी थेट दगड व विटांनी रुग्णालयातील कांचा फोडण्यास सुरुवात केली. या तोडफीडीत रुग्णालयाचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले. यासंदर्भात पंकज बागडे यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सचिन खडसे, रुपेश खडसे, गजानन खडसेसह १० ते १२ नातेवाईकांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, ३३६, ४२७, ५०४, ५०६ सहकलम प्रिव्हेंशन आॅफ व्हायलेंस डॅमेज प्रॉपर्टी अॅक्ट २०१० अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (प्रतिनिधी)
विषबाधेच्या रुग्णाला गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वप्रकारे रुग्णाची काळजी घेतली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. नातेवाईकांनी बिल दिले नाही. उलट रुग्णालयात गोंधळ घातला. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करावे, अन्यथा आंदोलन करू.
- वसंत लुंगे, अध्यक्ष, आयएमए.
सामान्य रुग्णालयातून विषबाधेचा रुग्ण आमच्या रुग्णालयात रेफर झाला. त्याची प्रकृती गंभीर होती. त्यांचे प्राण वाचविण्याचे आम्ही सर्वपरिने प्रयत्न केले. मात्र, नातेवाईकांनी रुग्णालयाचे बिल दिले नाही. उलट पीएम करायचे नाही, अशी भूमिका घेऊन त्यांनी थेट तोडफोड केली.
- पंकज बागडे,
वैद्यकीय तज्ज्ञ, रुग्णालय