गुन्हेगारीचा आलेख वाढला
By Admin | Updated: July 13, 2014 23:12 IST2014-07-13T22:50:22+5:302014-07-13T23:12:39+5:30
बायपासवर पोलीस चौकी अभाव

गुन्हेगारीचा आलेख वाढला
कारंजा: शहरातील बायपास परिसरात पोलीस चौकी नसल्यामुळे या परिसरात घडणार्या गुन्हेगारीचा आलेख दिवसागणिक वाढतच चालला आहे. शिवाय हा द्रृतगती महामार्ग असल्यामुळे अपघातांचे प्रमाणाही बर्यापैकी आहे.
शहरातील लोकसंख्येचा आलेख वाढताच असून, ही संख्या लाखाच्या घरात गेली आहे. स्थानिक बायपासवर तर नविन शहरच वसले आहे. शिक्षक कॉलनी, आदर्श नगर, शिंदे नगर, वनदेवी नगर, सातपुते ले-आऊट, प्रियदर्शिनी कॉलनी, मानक नगर तथा मानोरा मार्गावरही अनेक वस्तींची नव्याने निर्मिती झाली आहे. याशिवाय शहरापासून अवघ्या पाच किलो मिटर अंतरावर नागपूर-औरंगाबाद हा द्रूतगती मार्ग सुद्धा आहे.
त्यामुळे साहजिकच अपघात व इतर गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांना वाव मिळतो. विशेष म्हणजे या परिसरामध्ये यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांनी ही बाब अधोरेखित केली आहे. बायपास परिसरावरून पोलीस स्टेशन व नवीन बसस्थानक परिसराच्या चौकीचे अंतर जवळपास सारखेच आहे. एखादी तक्रार नोंदविण्यास जायचे असल्यास नागरिकांना मोठे अंतर गाठावे लागते. त्यामुळे अनेकजण तक्रार देणे टाळतात तर ज्यांना तक्रार देणे अतिशय गरजेचे वाटते त्यांना आर्थिक भुर्दंड सोसून पोलीस स्टेशन गाठावे लागते. बायपासवरील राणी झाँशी चौक परिसरात पोलीस स्टेशनने नवीन चौकी उघडल्यास नागरिकांना निश्चितच सोयीस्कर होणार आहे.