एकवीरा पतसंस्थेच्या अध्यक्ष, संचालकासह आठ जणांवर गुन्हे
By Admin | Updated: October 9, 2016 01:01 IST2016-10-09T01:01:04+5:302016-10-09T01:01:04+5:30
तालुक्यातील एका शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरून येथील एकविरा नागरी ..

एकवीरा पतसंस्थेच्या अध्यक्ष, संचालकासह आठ जणांवर गुन्हे
सर्व आरोपी पसार : शेत विक्री व्यवहाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील एका शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या तक्रारीवरून येथील एकविरा नागरी पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
शेत विक्रीच्या व्यवहारात खरेदीदार व दलालांनी दगाबाजी करून व्यवहाराची पूर्ण रक्कम न देता धमक्या दिल्याने दिलीप बाबाराव इंगळे (४०) यांनी ३० सप्टेंबरला आत्महत्या केली. ते येथील शहापुरा भागातील रहिवासी होते. त्यांचे मोठे बंधू विनायक इंगळे यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला. यामध्ये एकवीरा नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्ष व संचालकांसह तालुक्यातील इतर प्रतिष्ठितांचा समावेश आहे.
येथील वैकुंठधाम स्मशानभूमित ३० सप्टेंबर रोजी दुपारी दिलीप इंगळे यांनी गळफास घेतल्यानंतर ३ आॅक्टोबर रोजी याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली. तक्रारीनुसार, दिलीप यांनी आपल्या चिंचोली बु. येथील ३ एकर ३२ गुंठे शेताचा नोव्हेंबर २०१३ मध्ये सुरेश अढाऊ रा. खिराळा यांच्याशी ३ लाख रुपये घेऊन इसार केला होता. या व्यवहारात हरिभाऊ पळसकर व गजानन मंडपे हे दलाल होते. केवळ इसारावरच खरेदीदार व दलालांनी त्यांच्या शेतीचा दोन वर्षांपासून अनधिकृतपणे ताबा घेतला होता. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी येथील एकवीरा नागरी सह बँकेचे अध्यक्ष मधुसूदन गुजर यांनी प्रभुदास गायगोले यांच्या नावाने माझा भाऊ दिलीप याला कोणताही मोबदला न देता सदर शेतजमिनीची खरेदी करून घेतली, असा आरोप मृताच्या भावाने केला आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी घरी चिठ्ठी लिहिली असून त्यात आठजर्ण त्रास देत असल्याचा उल्लेख आहे. मृताचा मोठा भाऊ विनायक इंगळे रा. गावंडगाव यांनी ३ आॅक्टोबरला पोलिसात तक्रार दिली. यावरुन सातेगाव येथील हरिभाऊ पळसकर, गजानन मंडपे, खिराळा येथील सुरेश अढाऊ, अंजनगाव येथील मधुसूदन गुजर, प्रभुदास गायगोले, लक्ष्मण गायगोले, वसीम खान व चिंचोली बु. येथील बंडू बाबनेकर यांच्याविरुद्ध भादंवि ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहेत.
आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली. मात्र आरोपी आढळून आले नाही. याप्रकरणी तपास पथक नेमून तपासणी सुरू आहे.
- सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक, अंजनगाव सुर्जी.