कर्मचाऱ्यांकडून सुटेनात ‘मलईदार’ टेबल
By Admin | Updated: December 23, 2016 00:11 IST2016-12-23T00:11:13+5:302016-12-23T00:11:13+5:30
महापालिकेतील अनेक प्रशासकीय विभागामध्ये बहुतांश कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत.

कर्मचाऱ्यांकडून सुटेनात ‘मलईदार’ टेबल
आयुक्तांच्या बदली आदेशाला ठेंगा : अधिकारीही दाखवितात केराची टोपली
अमरावती : महापालिकेतील अनेक प्रशासकीय विभागामध्ये बहुतांश कर्मचारी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसले आहेत. एखादवेळी बदली झाल्यास कार्यमुक्त होण्यास टाळाटाळ करून ‘राजकीय फिल्डिंग’ लाऊन तोच टेबल राखून ठेवला जातो. याकर्मचाऱ्यांकडून आयुक्तांच्या बदली आदेशाला देखील ठेंगा मिळत आहे.
कार्यालयीन कामकाज सोयीचे व्हावे, यासाठी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. मात्र, अनेक कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजू होत नसल्याचे उघड झाले आहे. १० आॅगस्ट २०१६ ला आयुक्त हेमंत पवार यांनी तीन कनिष्ठ लिपिकांसह एका निरीक्षकाच्या बदलीचे आदेश काढले होते. मात्र प्रवीण इंगोले या निरीक्षकाचा अपवाद वगळता अन्य तीन लिपिक त्यांच्या बदली ठिकणी रुजू झालेले नाहीत. गजानन घुगे, सविता पाटील आणि नीरज ठाकरे या तीन कनिष्ठ लिपिकांची आरोग्य, पशुशल्य व लेखापरीक्षण विभागातून अनुक्रमे झोन क्र. १, विधी विभाग व जनसंपर्क विभागात बदली झाली होती. आदेश प्राप्त होताच संबंधितांनी बदली झालेल्या विभागात त्वरित रुजू व्हावे आणि तसा अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करावा, त्याचप्रमाणे विभागप्रमुखांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आयुक्तांचे आदेश आहेत.