पुढाऱ्यांच्या दबावापोटी भुयारांची तडीपारी
By Admin | Updated: November 7, 2016 00:08 IST2016-11-07T00:08:16+5:302016-11-07T00:08:16+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष देवेंद्र भुयार यांना पुढाऱ्यांच्या दबावापोटी हेतुपुरस्सर तडीपार करण्यात आले.

पुढाऱ्यांच्या दबावापोटी भुयारांची तडीपारी
रविकांत तुपकर : स्थानिक नेत्यांसह एसपींवर टीकास्त्र
अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष देवेंद्र भुयार यांना पुढाऱ्यांच्या दबावापोटी हेतुपुरस्सर तडीपार करण्यात आले. शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा हा प्रयत्न असून, भुयारांच्या तडीपारीने शेतकऱ्यांची चळवळ थांबणार नाही, असा इशारा राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी येथे दिला.
देवेंद्र भुयार यांना जिल्ह्यातून तडीपार केल्याच्या पार्श्वभूमिवर रविवारी तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. भुयारांवर तडीपारी लादणाऱ्या पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची बदली करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यामागणीसाठी सोमवारी खा. राजीव शेट्टी आणि दुग्ध विकासमंत्री सदा खोत हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोरांशी चाललेली आमची लढाई या तडीपारीमुळे थांबणार नाही. आतापर्यंत बऱ्याच जणांचा माज आम्ही उतरविला आहे. वरूडमधील स्थानिक आमदारांसोबत संबंधितांची मस्ती जिरविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा घणाघाती इशाराही त्यांनी दिला.
पंचायत समिती सदस्य देवेंद्र भुयार यांनी आतापर्यंत जी काही आंदोलने केलीत, ती शेतकरीभिमुख होती. जिल्ह्यातून तडीपार करावे, असा कोणताही गुन्हा वा कलम त्यांच्यावर नाही.
एसपींना वाघा बॉर्डरवर पाठवा
शेतकऱ्यांच्या चळवळी दडपण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी चालविला आहे. बुलडाण्यामध्येही त्यांनी तेच केले. चळवळ उभी राहू नये, अशी त्यांची मानसिकता आहे. ते जर इतकेच कर्तबगार असतील तर त्यांना वाघा बॉर्डरवर पाठविण्याची मागणी आपण सरकारकडे करू. एसपी लख्मी गौतम यांचे मानसिक संतुलन ढळले असून, ज्या पुढाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संगणमत करून भुयारांची तडीपारी घडवून आणली त्या लोकप्रतिनिधीला त्यांनी तडीपार करण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान त्यांनी केले.
लोकप्रतिनिधींची तडीपारी केव्हा ?
देवेंद्र भुयार यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत ज्या स्थानिक आमदाराने पडद्यामागे भूमिका वठविली, त्यांच्यावर कलम ३०७ सह अन्य विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. सत्ता वर्तुळात असतानाही त्यांनी दोन महिन्यांपूर्वी नायब तहसीलदारांना मारहाण केली होती. त्यापूर्वीही त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्यांना अटक करण्याचे धाडस पोलीस अधीक्षकांनी दाखविले नाही. एसपींनी आधी त्यांना तडीपार करावे, असे आव्हान तुपकर यांनी जिल्हाधिकारी आणि एसपींना दिले. या स्थानिक नेत्याचा सोफियामधील सहभाग जगजाहीर आहे. नाला खोलीकरणाचे कंत्राट कुणाकडे आहे. हे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे वारंवार पक्षबदल करणाऱ्या या लोकप्रतिनिधीने नैतिकतेचे धडे देऊ नयेत, असेही तुपकर म्हणालेत.स्थानिक आमदाराचा हात !
अमरावती : मात्र, मोर्शी-वरूडच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला भुयारांचे वाढते वर्चस्व खपले नाही व त्यांनी यंत्रणेला हाताशी धरून भुयारांचा गेम केल्याचा आरोप तुपकर यांनी केला.
तडीपारीचे निकष डावलून भुयार यांचा राजकीय बळी देण्यात आला. असे झाल्यास गावागावात देवेंद्र भुयार निर्माण होतील. प्रस्थापितांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना जाब विचारण्याची ताकद भुयार यांनी उभारलेल्या चळवळीतून निर्माण झाली होती. स्थानिक आमदारांची यात महत्त्वाची भूमिका आहे.