सीपींनी घेतला पोलीस अधिकाऱ्यांचा क्लास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:14 IST2021-07-27T04:14:22+5:302021-07-27T04:14:22+5:30
अमरावती : पाच दिवसांत तिघांचे खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सोमवारी ठाणेदार व अन्य पोलीस ...

सीपींनी घेतला पोलीस अधिकाऱ्यांचा क्लास
अमरावती : पाच दिवसांत तिघांचे खून झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सोमवारी ठाणेदार व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी योग्यरीतीने पार पाडा, नाकाबंदी वाढवा आणि त्यात संशयितांच्या दुचाकीच्या डिक्कीची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
सोमवारी दुपारी २ च्या सुमारास पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात या सूचना देण्यात आल्या. अलीकडच्या काळात झालेल्या घटनांमध्ये चायना चाकूचा वापर करण्यात आला. ते चाकू ‘डोमेस्टिक’मध्ये मोडतात. ते चाकू आर्म्स ॲक्ट या संज्ञेमध्ये बसत नाहीत. मात्र, ते ऑनलाईन बोलावले जातात. त्यावर अंकुश लावण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले. चायना चाकूच्या ऑनलाईन विक्रीला कशाप्रकारे प्रतिबंध घालता येईल, त्याबाबतही सूचना करण्यात आल्या. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने स्लम एरियातील दारूवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बार, हॉटेल रडारवर
बार, हॉटेल दुपारी ४ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची मुभा असली तरी होम डिलिव्हरीसाठी आपण हॉटेल, बार ९ वाजेपर्यंत उघडे ठेवत असल्याची सबब हॉटेल, बारचालकांनी दिली आहे. त्यामुळे दुपारी ४ नंतर कुठल्या हॉटेलमध्ये जेवण सर्व्ह तर केले जात नाही ना, ते पाहण्यासोबतच रात्री ९ नंतर कुठल्याही स्थितीत बार, हॉटेल सुरू दिसायला नकोत, असे कडक निर्देश देण्यात आले. दरम्यान, २३ जुलै रोजी रात्री ११ वाजता ज्या मराठा दरबार ढाब्यावर खून झाला, तो ढाबा ३० दिवसांसाठी सील करण्यात आला. महापालिकेने सीलची कारवाई अधिक दिवसांसाठी करावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या.