बकरी ईदसाठी गोवंश हत्या नाही
By Admin | Updated: September 23, 2015 00:09 IST2015-09-23T00:09:03+5:302015-09-23T00:09:03+5:30
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यामुळे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बकरी ईद उत्सवात गोवंश हत्या होेणार नाही, असे आदेश गृहविभागाने काढले आहेत.

बकरी ईदसाठी गोवंश हत्या नाही
गृहविभागाचे आदेश: जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सतर्कतेच्या सूचना'
अमरावती : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यामुळे गुरुवारी २४ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बकरी ईद उत्सवात गोवंश हत्या होेणार नाही, असे आदेश गृहविभागाने काढले आहेत. गोवंश हत्या करताना आढळल्यास संबंधितावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला दिल्या आहेत.
महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ अन्वये ४ मार्च २०१५ पासून राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. गोवंशहत्या, वाहतूक, मांसविक्री, कत्तल, गोवंश खरेदी-विक्री या प्रकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्याबंदी शिथिल करण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. मात्र, एकदा कायदा लागू झाल्यानंतर त्यात बदल किंवा शिथिलता करता येत नसल्याची भूमिका शासनाने घेतली आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश गृहविभागाने प्रशासनाला दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत येणारे कत्तलखाने, पशुंच्या अवैध हत्या, पशु वाहतुकीवर बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आहेत. महापालिकेचे सहायक पशू शल्यचिकित्सक सचिन बोंद्रे यांनी बकरी ईदच्या निमित्ताने मांस विक्रेत्यांना नोटीस बजावून कडक सूचना दिल्या आहेत.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या होणार नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा पशू संवर्धन विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोवंश हत्या करताना कोणी आढळल्यास कठोर कारवाई होईल.
- किरण गित्ते, जिल्हाधिकारी
बकरी ईद : शहरात आठ चेकपोस्ट
अमरावती : बकरी ईद निमित्त शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ८ चेकपोस्ट तयार करण्यात आले असून जनावरांच्या वाहतुकीकडे पोलीस लक्ष केंद्रीत करणार आहेत. पालकमंत्र्यांसोबत शहरातील वाहतुकीचा आढावा घेताना त्यांनी दिलेल्या निर्देशांवर अंमलबजावणी सुरु केल्याची माहिती पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
शहरातील विस्कळीत वाहतुकीसंदर्भात सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे व पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी आढावा घेतला. पालकमंत्र्यांनी दिलेले निर्देश व सूचनांवर अंमलबजावणी करण्यात आली असून हळूहळू वाहतूक सुरळीत होईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त व्हटकर यांनी दिली. गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारणे, चौका-चौकात दिशादर्शक फलक लावणे अत्यावश्यक आहे. त्याकरिता पोलीस विभागाकडून महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त व्हटकर यांनी सांगितले. सणासुदीच्या पार्श्वभूमिवर शहरात शांतता, सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रयत्नरत असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)