कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:56+5:30
जिल्ह्यात हेल्पलाईननंतर आता कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’ हा नवा उपक्रम राबविला जात आहे. कोविड १९ हॉस्पीटलमधून संक्रमित रूग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर त्यांच्याशी डॉक्टरांच्या अधिनस्थ परिचारिका, आरोग्य कर्मचारी सकाळ आणि सायंकाळी टेलिफोनद्वारे संवाद साधून रूग्णाचे आरोग्य, त्यांच्या कुटुंबीयांची माहिती जाणून घेतील.

कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना संक्रमितांची वाढती संख्या निश्चितच चिंताजनक आहे. मात्र,‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ डिस्चार्ज झालेल्या रुग्णांशी संवाद साधणे आणि कोरोना नियंत्रणासाठी आता ‘कोविड हेल्थलाईन’ गठित करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवारपासून या मोहिमेस प्रारंभ झाला.
जिल्ह्यात हेल्पलाईननंतर आता कोरोना नियंत्रणासाठी ‘कोविड हेल्थलाईन’ हा नवा उपक्रम राबविला जात आहे. कोविड १९ हॉस्पीटलमधून संक्रमित रूग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर त्यांच्याशी डॉक्टरांच्या अधिनस्थ परिचारिका, आरोग्य कर्मचारी सकाळ आणि सायंकाळी टेलिफोनद्वारे संवाद साधून रूग्णाचे आरोग्य, त्यांच्या कुटुंबीयांची माहिती जाणून घेतील. त्यानुसार घरी बरे होऊन गेलेल्या होम क्वारंटाईन असलेल्या ४५ रुग्णांसोबत इर्विनमधील कोविड हेल्थलाईन चमुने गुरूवारी संवाद साधल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
‘पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ रूग्णांना मार्गदर्शन करणे, आरोग्याची काळजी घेणे आणि आहारविषयी संवादातून काही टिप्स दिला जात आहे. शुक्रवारी होम क्वारंटाईन ५० रुग्णासोबत संवाद साधण्यात आला. निगेटिव्ह झालेल्या रूग्णासोबत सलग चार ते पाच दिवस संपर्क साधून संवाद साधण्याचा हा उपक्रम आहे. संवादातून रुग्णांचे मनोबल उंचावले आणि कुटुंबीयांची माहिती मिळविणे हा उद्देश आहे. जेणेकरून कोरोनावर नियंत्रण मिळविता येईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले.
कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांवर विशेष नजर
कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन वेळीच उपचार करणे आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये संसर्ग पसरू नये, यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. मेळघाट, अचलपूर व चांदूर बाजार येथील कोरोना लक्षणे असलेल्या रुग्णांना चांदूर बाजार येथे आयसोलेटेड करण्यात येणार आहे. तर, मोर्शी, तिवसा येथील लक्षणे आढळत असलेल्या रुग्णांना मोझरी येथील आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीत असणार आहे. एकूणच कोरोना लक्षणांच्या रुग्णावर जिल्हा प्रशासनाची विशेष नजर असणार आहे.