रेतीतस्करीवर पांघरूण; खड्डे बुजविण्याचा खटाटोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST2021-04-03T04:11:35+5:302021-04-03T04:11:35+5:30
फोटो पी ०१ परतवाडा : लिलावात घेतलेल्या निर्धारित रेतीघाटाऐवजी दुसऱ्याच भागातून केलेल्या रेतीचोरीचे पुरावे नष्ट करण्याचा प्रकार माफियांकडून सुरू ...

रेतीतस्करीवर पांघरूण; खड्डे बुजविण्याचा खटाटोप!
फोटो पी ०१
परतवाडा : लिलावात घेतलेल्या निर्धारित रेतीघाटाऐवजी दुसऱ्याच भागातून केलेल्या रेतीचोरीचे पुरावे नष्ट करण्याचा प्रकार माफियांकडून सुरू झाला आहे. बुधवारी मध्यरात्रीनंतर पूर्णा नदीपात्रातील काही मोठे खड्डे जेसीबीने बुजवण्यात आले. रेती तस्करीवर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न असून, महसूल यंत्रणेने बाळगलेले मौन संशयास्पद ठरले आहे.
भातकुली तालुक्यातील पोहरा पूर्णा परिसरातून वाहणाऱ्या पूर्णा नदीपात्रात रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा परिसरातील पात्रातून शेकडो ब्रास अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करण्यात आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. महसूल प्रशासनाने काही खड्डे गत आठवड्यात दिवसा बुजविले होते. या खड्ड्यांची चौकशी झाल्यास रेती माफियांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती पाहता, बुधवारी मध्यरात्रीनंतर जेसीबीने येलकी पूर्णा परिसरातील नदीपात्रात केलेले खड्डे बुजवण्यात आले. नदीपात्रात जेसीबीच्या चाकांच्या खुणा आणि बुजवलेले खड्डे स्पष्टपणे दिसत आहेत.
बॉक्स
महसूल विभागाची कारवाई का थांबली?
पंधरा दिवसांपूर्वी अचलपूरच्या महसूल अधिकाऱ्यांनी पाच ट्रक अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतूक करताना पकडले होते. त्यानंतर सदर नदीपात्रात असलेल्या खड्ड्यांचे पूर्णत: मोजमाप करून संबंधित रेती माफियांवर कारवाई करणे गरजेचे होते. परंतु, प्रत्यक्षात तसे झाले नाही. रेतीचोरांना खड्डे बुजविण्यासाठी वेळ देण्यात आला. त्यामुळे महसूल विभागाची भूमिका ही सर्वसामान्यांमध्ये रेती माफियांना बळ देणारी व शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविणारी ठरली आहे.
बॉक्स
पाच दिवसांपासून घाट बंद
एकाच रॉयल्टी पासवर अनेकदा ट्रिप मारून शासनाचा महसूल बुडविणारा रेती माफियांचा हा कावा ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यामुळे त्यांची चोरी पुढे आली. परिणामी, मागील पाच दिवसांपासून घाट बंद असून, येत्या एक-दोन दिवसांत पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यापूर्वीच लिलावात क्षेत्र नसलेल्या इतर परिसरातिल अवैध उत्खनन करून केलेल्या खड्ड्यांना रात्रीतून नियमबाह्यरीत्या बुजवण्यात आले.