ग्राहक संघटना ठोठावणार न्यायालयाचे दार !
By Admin | Updated: October 8, 2016 00:10 IST2016-10-08T00:10:53+5:302016-10-08T00:10:53+5:30
चिवड्यात चक्क पाल आढळूनही अन्न प्रशासन विभागाने चिवड्याचे पाकीट, चिवडा आणि पाल पंचनामा करून ...

ग्राहक संघटना ठोठावणार न्यायालयाचे दार !
बोथट संवेदना : पालयुक्त चिवड्याचे अद्यापही नमुने नाही
अमरावती : चिवड्यात चक्क पाल आढळूनही अन्न प्रशासन विभागाने चिवड्याचे पाकीट, चिवडा आणि पाल पंचनामा करून ताब्यात न घेतल्याने काही ग्राहक संघटनांनी आता याविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
ग्राहकांच्या हितासाठी जागरूक राहण्याचे शासनादेश असतानाही अन्न व औषधी प्रशासन विभाग ग्राहकांच्या हिताशी, आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांना बळ देतात. 'ग्राहकांना अळ्या नि अधिकाऱ्यांना काजू' अशी स्थिती यापूर्वीच 'लोकमत'ने छायाचित्रासह लोकदरबारात मांडली होती.
मनभरी प्रकरणात अन्न प्रशासन अधिकाऱ्यांनी या मुद्याचा कळसच गाठला. फोन केल्यानंतरही एफडीए अधिकाऱ्यांनी फोन 'स्वीच्ड आॅफ' करून ठेवले. केवळ मनभरी उत्पादन करणाऱ्या कंपनीला पाठीशी घालण्यासाठी अधिकारी छुपे कार्य करीत आहे, अशी लोकभावना निर्माण झाली आहे.
सामान्य ग्राहकांच्या हक्कासाठी जागरूक असणाऱ्या काही ग्राहक संघटनांनी या मुद्यावर एकमत करून संघर्षाची तयारी सुरू केली आहे. ग्राहकांना पुरविले जाणारे अन्न शुद्ध, स्वच्छ आणि आरोग्यदायी असावे हा त्यामागचा हेतू आहे. ग्राहक संरक्षणासाठी निर्माण करण्यात आलेले कायदेच मुळी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे अस्तित्वहीन झाले आहेत. धाक दाखवून व्यावसायिकांकडून मासिक वसुली करणे हाच केवळ अन्न व औषधी प्रशासन विभागासाठी ग्राहक संरक्षण कायद्याचा आणि अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याचा उपयोग आहे.
कायद्याची अंमलबजावणी करणे हे कर्तव्य प्रशासनाचे आहे. परंतु प्रशासन त्यांच्या कर्तव्यापासून फारकत घेत ग्राहकांना मृत्यूच्या दाढेत ढकलू लागले आहे. या धोकादायक नांदी आहेत. शासन या मुद्यावर मूक आहे. सामान्यांना सुरक्षितपणे जगता यावे, यासाठी लवकरच न्यायालयात दाद मागितली जाणार आहे.