अभ्यासक्रम गाळला, शाळा ऑनलाईन, शुल्क १०० टक्के !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:20+5:302021-03-04T04:22:20+5:30
वरूड : नोव्हेंबर २०२० पासून शाळा ऑफलाईन उघडल्या अन् जानेवारीत पुन्हा ८ मार्चपर्यंत बंद झाल्या. तत्पूर्वी ऑनलाईन अभ्याक्रमात ...

अभ्यासक्रम गाळला, शाळा ऑनलाईन, शुल्क १०० टक्के !
वरूड : नोव्हेंबर २०२० पासून शाळा ऑफलाईन उघडल्या अन् जानेवारीत पुन्हा ८ मार्चपर्यंत बंद झाल्या. तत्पूर्वी ऑनलाईन अभ्याक्रमात शिक्षक व्यस्त झाले. साधारणत: सप्टेंबरपासून ऑनलाईन क्लासेस, तेही उणेपुरे तास-दोन तास सुरू झाले. यादरम्यान शाळा सुरु होताच अर्ध्याच्या पुढील अभ्यासक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचा पाठ्यक्रम विद्यार्थ्यांपुढे आलाच नाही. अभ्यासक्रम अर्धा, ऑनलाईन शाळेचा पुरता गोंधळ असताना, शाळा सुविधेसाठी आकारले जाणारे शिक्षण शुल्क मात्र १०० टक्के वसूल केले जात आहे. हे अर्थकारण जुळत नसल्याने न्याय कुणाला मागावा, हा प्रश्न पालकांना पडला आहे .
लॉकडाऊन व अनलॉकच्या काळात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुरांनी पोटाची सोय लावावी की आधी अॅन्ड्राॅईड मोबाईल घ्यावा, असा पेचप्रसंग उद्भवला. शासन, प्रशासन व शिक्षण संस्थाचालकांच्या मेतकुटातून ऑनलाईन क्लास ही नवीन प्रणाली जन्माला आली. ऑनलाईन अभ्यासक्रमाला प्राधान्य देत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनीही शिक्षकमित्र ठेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याचा आव आणला. मात्र, ऑनलाईन अभ्यासासाठी कुठे मोबाईल नाही, कुठे नेट रिचार्ज मिळत नाही, तर कुठे रेंज नाही. या समस्या सरकारपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे ऑनलाईन क्लासच्या पटसंख्येला मर्यादा आली.
दरम्यान, आता खासगी शाळांनी प्रथम सत्राचा अभ्यासक्रम सोडून द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमापासूनच शिकविणे सुरू केले. एवढ्यावरच या शाळा थांबल्या नाही, तर जयंती उत्सव, स्पर्धासुद्धा ऑनलाईन घेऊन त्याची प्रसिद्धी केली जात आहे. त्याअनुषंगाने शिक्षण विभागाने ऑनलाईन अभ्यासक्रम बंद करून ऑफलाईन अभ्यासक्रम घेण्यास सांगावे व शिक्षणाच्या नावावर होणारी लूट थांबावावी, रस्त्यावर उतरण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
कोट १
अर्ध्या अभ्यासक्रमाचे आदेश नाहीत. २५ टक्के अभ्यासक्रम वगळून अभ्यासक्रम घ्यावा, याबाबत पत्र शाळेला पाठविले आहे. ज्यांच्याकडे मोबाईल असेल, त्यांना ऑनलाईन, तर उर्वरित विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिकवावे, असे आदेश दिले आहेत.
राजेंद्र साबळे, गटशिक्षणाधिकारी
कोट २
अर्ध्याच अभ्यासक्रमाचे आदेश नव्हते. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहे, त्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवावा तसेच ऑफलाईनसुद्धा अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे पत्रक आहे. शाळेने दुसऱ्या सत्रापासून अभ्यासक्रम सुरू केला, याबाबत पालकांनी तक्रार केल्यास आम्ही चौकशी करू. शासकीय वा अनुदानित शाळा शुल्क आकारत नाही. विनाअनुदानित शाळांसाठी ती अंतर्गत बाब आहे.
- ई.झेड. खान, शिक्षणाधिकारी
कोट ३
नोव्हेंबरला शाळा सुरू होताच शिक्षकांनी प्रथम सत्राचा अभ्यासक्रम सोडून द्वितीय सत्राचा अभ्यासक्रमापासून २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात सुरू केला. शिक्षकांनी संपूर्ण अभ्यासक्रम शिकवावा तसेच अर्धवट अभ्यासक्रम शिकविणाऱ्या शाळेची चौकशी करण्यात यावी.
- तुषार घोरमाडे, पालक, वरूड
----------