शेताच्या मोजणीत पाणंद रस्ताच केला गायब
By Admin | Updated: July 20, 2014 23:59 IST2014-07-20T23:59:07+5:302014-07-20T23:59:07+5:30
स्थानिक भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने शेताच्या मोजणीदरम्यान इमामपूर येथील शेतकऱ्याच्या शेतातून वाहितीचा पाणंद रस्ताच गायब केल्याची घटना उघडकीस आली आहे.

शेताच्या मोजणीत पाणंद रस्ताच केला गायब
सुरेश सवळे - चांदूरबाजार
स्थानिक भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने शेताच्या मोजणीदरम्यान इमामपूर येथील शेतकऱ्याच्या शेतातून वाहितीचा पाणंद रस्ताच गायब केल्याची घटना उघडकीस आली आहे.
एकीकडे शासनाने शेतकऱ्यांना वाहितीला सोईचे व्हावे म्हणून पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम उघडली आहे. तर दुसरीकडे शासनाचे भूमिअभिलेख अधिकारीच या योजनेला तिलांजली देऊन शेताच्या मोजणीत या पाणंद रस्त्यांची विल्हेवाट लावताना दिसून येत आहेत. चांदूरबाजार येथील भूमी अभिलेख कार्यालयात स्वप्नील उंबरकर नामक भूमापक कार्यरत आहे. या भूमापकाने शेताच्या मोजणीदरम्यान इमामपूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील वाहितीचा पाणंद रस्ताच गायब करून शेजारच्या शेतात विलीन केल्याची किमया केली. ही बाब मूळ शेतमालक विनायक वाकोडे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी या भूमापकाने शेजारच्या शेतमालकासोबत अर्थपूर्ण व्यवहार करून चुकीची मोजणी केल्याचा आरोप केला. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली. याबाबतचे निवेदन त्यांनी भूमिअभिलेख संचालक, पुणे व भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षकांकडे दिले.
मनोहर बिहुरे यांनी इमामपूर शेत शिवारातील २७/३ या शेताच्या मोजणीची मागणी केली होती. त्यानुसार विनायक वाकोडे यांना शेजारी शेतमालक म्हणून शेतात हजर राहण्याबाबत नोटीस दिली. भूमापक स्वप्नील उंबरकरकडे मोजणीची जबाबदारी सोपविली होती. परंतु त्यांनी चुकीची मोजणी करून वाकोडे यांच्या शेतातील वाहितीचा पाणंद रस्ताच बिहुरे यांच्या शेतात समाविष्ट करून टाकला. ही बा वाकोडे यांनी उंबरकर यांच्या लक्षात आणून देताच चूक कबूल करण्याऐवजी उंबरकर यांनी वाकोडे यांना धमकावून पोलीस कारवाईची धमकी दिल्याचा आरोप वाकोडे यांनी केला आहे. त्यांनी उंबरकरविरूध्द कारवाईची मागणी केली आहे.
उंबरकर यांचे हे प्रकरण नवीन नसून यापूर्वीही जगन्नाथपूर येथील एका महिलेच्या शेताची मोजणी करताना त्यांनी या शेताचा काही भाग गावाच्या गावठाणमध्ये दाखविला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याचा विरोध केला होता.
या मोजणीत या महाशयांनी जिल्हा परिषद शाळेचे कंपाऊंड, प्रसाधनगृह, शाळेची खुली जागा व गावातील शासकीय पाण्याची विहीरदेखील त्या महिलेच्या शेतात दाखविली होेती, हे विशेष.