-आता महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे समुपदेशन
By Admin | Updated: October 8, 2015 00:13 IST2015-10-08T00:13:07+5:302015-10-08T00:13:07+5:30
गुलाबबाबा नगरातील अकलेश मोहोडने महापालिका शाळा क्रमांक १७ च्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली.

-आता महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे समुपदेशन
अलकेशच्या मृत्यूनंतर प्रशासन जागे : स्वच्छतेबाबतही विशेष सूचना
अमरावती : गुलाबबाबा नगरातील अकलेश मोहोडने महापालिका शाळा क्रमांक १७ च्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर महापालिका प्रशासन विशेषत: शिक्षण विभागाला खडबडून जाग आली असून आता महापालिकेच्या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक वाकोडे यांनी घेतला आहे.
अलकेशला आईने खाऊसाठी पैसे न दिल्याने त्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे अकलेशचे मित्र व शाळेतील अन्य विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. अलकेशच्या मृत्यूमुळे शाळेला एक दिवस सुटी देण्यात आली होती. सायंकाळी अलकेशच्या पार्थिवावर विलासनगरातील हिन्दू स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी शाळेत अनेक विद्यार्थी अनुपस्थित होते.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने बुधवारी तत्काळ सर्व शाळा परिसर स्वच्छ करण्याच्या सूचना स्वच्छता विभागाला दिल्यात. त्याप्रमाणे सकाळपासूनच शाळेचे संपूर्ण आवार स्वच्छ करण्यात आले. तसेच बालवयात आत्महत्येचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता बदलविण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय प्रभारी शिक्षणाधिकारी अशोक वाकोडे यांनी घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या सर्वच शाळेतील शिक्षकांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. आत्महत्येच्या विचारपासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने आता महापालिकेच्या ६६ शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रबोधन व मार्गदर्शन करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)