परतवाड्यात परप्रांतांतील कापूस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:41+5:30

स्थानिक शेतकऱ्याच्या सातबारावर परप्रांतातील कापूस मोजला जात आहे. या शासकीय कापूस खरेदीचा फायदा सर्वसामान्य कापूसउत्पादक शेतकऱ्याला कमी आणि व्यापाऱ्यालाच अधिक होत आहेत. अचलपूरसह चांदूर बाजार व लगतच्या तालुक्यातील, उत्पादकता बघता वाढलेली आवक कृत्रिम असून, परप्रांतातील कापसामुळे गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढीवर आहे.

Cotton in the Paratwada backyard! | परतवाड्यात परप्रांतांतील कापूस!

परतवाड्यात परप्रांतांतील कापूस!

ठळक मुद्देशेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या गाड्या अधिक : आवक वाढली, खरेदी थांबली

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : कापसाचे परप्रांतातील दर महाराष्ट्रातील शासकीय कापूस खरेदी केंद्रांपेक्षा कमी असल्यामुळे आंध्र प्रदेशसह लगतच्या प्रांतांतील कापूस मोठ्या प्रमाणात परतवाडा, अंजनगाव येथे दाखल होत आहे. परप्रांतातील कापसाचे हे ट्रकचे ट्रक शहरात रिते केले जात आहेत. स्थानिक कापसात पाला करू न (मिसळून) गाडी भरताना विशेष दक्षता घेत, हा कापूस शासकीय खरेदी केंद्रावर पाठवला जात असल्याची माहिती आहे.
स्थानिक शेतकऱ्याच्या सातबारावर परप्रांतातील कापूस मोजला जात आहे. या शासकीय कापूस खरेदीचा फायदा सर्वसामान्य कापूसउत्पादक शेतकऱ्याला कमी आणि व्यापाऱ्यालाच अधिक होत आहेत. अचलपूरसह चांदूर बाजार व लगतच्या तालुक्यातील, उत्पादकता बघता वाढलेली आवक कृत्रिम असून, परप्रांतातील कापसामुळे गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढीवर आहे.
गावखेड्यात शेतकऱ्यानी यापूर्वीच आपला कापूस कमी भावात गावातून जागी मोजून दिला. हा गावखेड्यात जाऊन व्यापाऱ्यानी घेतलेला कापूस परप्रांतातील कापसासोबत मिसळविल्या जात आहे. अचलपूर कृषिउत्पन्न बाजार समितीत कापूस भरलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. दररोज शंभर ते दोनशे गाड्यांहून अधिक गाड्या बाजार समितीच्या आवारात येत आहेत. अचलपूर-परतवाडा येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर आतापर्यंत ४० हजार क्विंटल कापूस खरेदी केला गेला. लक्ष्मी आणि संतोष कॉटन इंडस्ट्रीजवळ हा कापूस मोजून घेण्यात आला. चांदूर बाजारला शासकीय खरेदी केंद्र नसल्यामुळे, जे केंद्र जवळ पडेल तेथे त्यांना कापूस नेण्याची मुभा देण्यात आली आहे.
अचलपूरमध्ये डिसेंबर मध्ये केवळ ३ हजार ८०० क्विंटल कापसाची खरेदी होती, ती आज ४० हजार क्विंटल पर्यंत पोहोचली आहे. लगतच्या अंजनगावात ७० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

दोनवेळा खरेदी थांबविली
अचलपूर येथे ढगाळ वातावरणामुळे फेब्रुवारीमध्ये, तर जागेअभावी मार्चमध्ये शासकीय कापूस खरेदी थांबविण्यात आली आहे. आठ-दहा बैलगाड्या सोडल्या, तर कापूस बहुतांश वाहनातून दाखल झाला. मार्चमध्ये कापूस खरेदी थांबविल्यानंतर बाजार समितीच्या आवारात उभ्या कापसाच्या वाहनांचे पंचनामे करून ते मोजन घेतल्याची माहिती आहे.

शासकीय खरेदी केंद्रावर दाखल कापूस परप्रांतातील नाही. आंध्रप्रदेशातील कापूस परतवाड्यात येत असला तरी तो शासकीय खरेदी केंद्रावर मोजण्यात आलेला नाही. निर्धारित आर्द्रता असलेला कापूसच प्रतवारीनुसार मोजून घेतला जात आहे.
-विनोद देशमुख, ग्रेडर तथा केंद्र प्रमुख, अचलपूर

Web Title: Cotton in the Paratwada backyard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती