भ्रष्ट वीज अभियंत्याची शेतकऱ्यांनी काढली वरात!

By Admin | Updated: October 20, 2015 00:15 IST2015-10-20T00:15:14+5:302015-10-20T00:15:14+5:30

शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या डीबीसाठी प्रत्येकाकडून दोन हजार रूपयांप्रमाणे ...

Corrupt electricity engineer removed the farmers! | भ्रष्ट वीज अभियंत्याची शेतकऱ्यांनी काढली वरात!

भ्रष्ट वीज अभियंत्याची शेतकऱ्यांनी काढली वरात!

डीपी बसविण्यासाठी घेतले पैसे : रक्कम परत देण्याचे दिले लेखी आश्वासन
परतवाडा : शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या डीबीसाठी प्रत्येकाकडून दोन हजार रूपयांप्रमाणे वर्षभरापूर्वी रक्कम वसूल करणाऱ्या अचलपूर वीज कंपनीच्या सहायक कार्यकारी अभियंताची संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी २ वाजता वरात काढली. घेतलेली रक्कम परत देण्याच्या आश्वासनासह डीबी बसवून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी अभियंत्याला मुक्त केले.
फुलचंद मारोती टेंभेकर असे अचलपूर वीज वितरण कंपनीच्या सहायक कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. त्याच्याकडे धानोरा पूर्णा परिसराचा कार्यभार आहे.
धानोरा पूर्णा येथील शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने त्यांना ओलीत करता येत नव्हते. त्यासाठी त्यांनी गतवर्षी आॅक्टोबर २०१४ मध्ये संबंधित विद्युत कार्यालयात डीबी बसवून देण्याची लेखी मागणी केली होती. आवश्यक ती कागदपत्रेसुध्दा शेतकऱ्यांनी सादर केली होती. परंतु अभियंता फुलचंद टेंभेकर यांनी डीबी बसवून देण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याकडून दोन हजार रूपये याप्रमाणे ४० हजारांची रक्कम घेतली. डीबी बसल्यानंतर पिकांचे नुकसान होणार नाही, या आशेवर शेतकऱ्यांनी ही रक्कम दिली. मात्र, वर्ष उलटून गेल्यानंतरही डीबी बसविण्यात आली नाही. आंदोलनकर्त्यांमध्ये बाबूराव काळे, बाबूभाऊ वैद्य, प्रकाश राऊत, गजानन पारिसे, शे. बशिर सौदागर, दिगंबर साऊरकर, दीपक कडू, प्रवीण वऱ्हाडे, कृपासागर राऊत, रवी चांदूरकर, अश्विन मानकर, गजानन डवरे, रोशन भडांगे, मोषराज दांडगे, राहुल सोलव, मनोज मांडवकर, किशोर तायडे उपस्थित होते. या घटनेबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते बैठकीला गेल्याचे सांगण्यात आले.
- आणि शेतकरी झालेत आक्रमक
गेल्या वर्षभरापासून वीज कंपनीच्या पायऱ्या झिजविणारे शेतकरी सोमवारी दुपारी १ वाजता कार्यालयावर धडकले. त्यांनी पुन्हा टेंभेकर यांना विनंती केली. मात्र, त्यांनी टोलवाटोलवीचे उत्तर दिले. याचवेळी तेथे उपस्थित चांदूरबाजार पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश पवार यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी अभियंत्याला जाब विचारला असता त्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याची कबुली दिली. त्यानंतर शेतकऱ्यांनी अभियंत्याला पायी परतवाडा ठाण्यात नेले. तेथे त्याने शेतकऱ्यांची रक्कम परत करण्याचे लेखी आश्वासन दिले. (प्रतिनिधी)

नापिकी व अपुरा पाऊस यामुळे पीक हातातून गेल्याने विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशात भ्रष्ट विद्युत अभियंतेदेखील त्यांची लूट करीत आहेत. अशांवर फौजदारी करून त्यांना निलंबित करावे.
- योगेश पवार,
माजी उपसभापती.

धानोरा पूर्णा येथील शेतकऱ्यांकडून वर्षभरापूर्वी अभियंता टेंभेकर यांनी ४० हजार रूपये घेतले. मात्र, डीबी बसवून दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक ओलिताअभावी शेतातच सुकू लागले आहे.
- प्रकाश राऊत,
शेतकरी, धानोरा पूर्णा.

Web Title: Corrupt electricity engineer removed the farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.