अंजनगाव तालुक्यात कोरोनाचा नवा ‘हॉट स्पॉट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:13 IST2021-02-24T04:13:50+5:302021-02-24T04:13:50+5:30
एकाच दिवशी ५३ रुग्ण पॉझिटिव्ह : प्रशासनासह नागरिकही बिनधास्त वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : तालुक्यात व शहरात सोमवारी ...

अंजनगाव तालुक्यात कोरोनाचा नवा ‘हॉट स्पॉट’
एकाच दिवशी ५३ रुग्ण पॉझिटिव्ह : प्रशासनासह नागरिकही बिनधास्त
वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : तालुक्यात व शहरात सोमवारी एकाच दिवशी ५३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासोबतच नागरिकांची घाबरगुंडी उडाली आहे. अंजनगाव सुर्जी शहर पुन्हा कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ होण्याची शक्यता असताना नागरिक व प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
अंजनगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची वाढत असलेली संख्या चिंताजनक असून, आठ दिवसांत ५७ रुग्ण निघाल्यानंतर सोमवारी एकाच दिवशी ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने शहरात चर्चेला उधाण आले. मात्र, नागरिक व प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत होते. प्रशासनाने आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने येथील सोमवारी भरणारा आठवडी बाजार भरला नाही. परंतु, शहरातील पाचपावली परिसरात गर्दी पाहण्यालायक होती. एकाच दिवशी झालेला हा स्फोट गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने केलेल्या लग्न समारंभ, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना अकारण मुभा दिल्याने झाल्याची चर्चा असून, आता तरी काही दिवस यावर कडक प्रतिबंध लावण्याची मागणी होत आहे.
अंजनगावातही लॉकडाऊनची शक्यता
अमरावती महापलिका, अचलपूर नगरपालिका या क्षेत्रात सोमवार सायंकाळपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आता अंजनगावातही कोरोना रुग्णांचा आकडा फुगत चालल्याने लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही. त्या भीतीपोटी सोमवारी व मंगळवारी शहरात नागरिकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळाली.
---