आरोग्यातील कोरोना योद्धे वेतनासाठी उतरले रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:21+5:302021-02-05T05:26:21+5:30
झेडपीसमोर धरणे : नोव्हेंबर महिन्यापासून पगार नसल्याने रोष अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत १५ तालुक्यांत विविध ठिकाणी ...

आरोग्यातील कोरोना योद्धे वेतनासाठी उतरले रस्त्यावर
झेडपीसमोर धरणे : नोव्हेंबर महिन्यापासून पगार नसल्याने रोष
अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अखत्यारीत १५ तालुक्यांत विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील नोव्हेंबर महिन्यापासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे हेल्थ एम्पाइज फेडरेशनच्या नेतृत्वात आरोेग्य विभागातील कर्मचाऱ्यांची सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून लक्ष वेधले.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व संवर्गनिहाय कर्मचाऱ्यांचे वेतन १ ते ५ तारखेच्या आत करण्यात यावे, मागील २ वर्षांपासून कार्यालयात वेतन बिल कधीही २० ते २५ तारखेच्या आत जात नाही. परिणामी वेतन उशिरा मिळते. याला जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, नव्याने सुरू झालेल्या ३ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांचे वेतन मागील १ वर्षापासून ऑफलाइन सुरू आहे. या कर्मचाऱ्याचे वेतन ऑनलाईन करण्यात यावे, तसेच ऑक्टोबर महिन्याचे अडकलेले वेतन अद्यापही झाले नाही ते देण्यात यावे, मेळघाटमधील कर्मचाऱ्यांच्या सन २०१९ मध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात यावे, पदोन्नतीची प्रकरणे पेंडिंग ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी व पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वारे सीईओ व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी आंदोलनात हेल्थ एम्प्लाइज फेडरेशनचे अध्यक्ष देवेंद्र शिंदे, विनोद डोंगरे, रजनीकांत श्रीवास्तव, अशोक पोकळे, बाबूलाल सिरसाट, सुभाष चव्हाण, विनोद पारोदे, गाेकुळ बांबल, अर्चना धुर्वे, गंगा सूर्यवंशी, शालिनी भाकरे, सुनंदा राऊत, सुजाता रोडगे, प्राची घोरमाडे, लक्ष्मी बनसोड, संगीता ढेवले, स्वाती अळसपुरे, गायत्री साउरकर, श्वेता जयस्वाल, अतुल वानखडे, कुलदीप रुद्रकार, विवेक उमप, प्रदीप होले यांच्यासह मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.