माणुसकी विसरलेली माणसे
वरुड : गेल्या दोन महिन्यांच्या काळात कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून कोरोना कोविड १९ मुळे देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे माणुसकीचे आणि रक्ताचे नातेही दुरावले आहे. भाऊ भावाला, बहीण भावाला आणि मुलगा बापाला आणि वडील काकाला, मित्र मित्राला विसरला असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या घाराजवळून सुद्धा कोणी फिरकत नाही. कोरोनाने गरीब- श्रीमंत भेदसुद्धा तोडला असून सर्व एका शृंखलेत गुंफले आहे. माणुसकी विसरून स्वार्थ बघायला लागला तर स्वतःचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आहे. दरवाजबंद प्रणाली सुरू झाल्याने कुठे गेले माणुसकीचे बंधन, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारित आहेत. राजा आणि रंक एकाच माळेचे मणी झाले आहेत. सर्वसामान्य जनता भाकरीच्या शोधात वणवण भटकंती करीत असून स्वत:ला उच्चंभ्रू समजणारे भावाला भाऊ , बहीण , काका, बाप , आई हे सर्व नाते विसरून दरवाजाबंद झाले, तर देशात राज्यकर्त्यांनी नागरिकांच्या मनात तुफान भीतीचे वातावरण निर्माण केल्याने बाप मेला तरी मुलगा आला नाही, तर जन्म देणारी आई गेली तरी मुलांनी व्हॉट्सॲपवर व्हिडीओ चॅटिंग करून अंत्यदर्शन घेतले. अनेकांच्या शुभमंगलाचा आस्वाद नात्यागोत्यातील लोकांनी मोबाइलवरच घेऊन अक्षता टाकल्या जात आहेत. ही भारतीय संस्कृती विज्ञान आणि कलियुगात पाहावयास मिळत आहे तर कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाल्यावर सख्ख्या मुलांने सुद्धा अंत्यसंस्काराला पाठ देऊन सफाई कामगारांकडून तर कुठे शेजारच्या परधर्मीयांकडून अंत्यसंस्कार करून घेतल्याची उदाहरणे घडत आहेत. तर आजारी रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी सुद्धा आप्तस्वकीय पुढे येत नाहीत, अशी अवस्था झाली आहे. काय तर केवळ कोरोनापासून बचाव झाला पाहिजे म्हणून एवढा उपद्व्याप केला. कुठे गेले रक्ताचे नाते, कुठे गेला जिव्हाळा, हा प्रश्न अनेकांना सतावू लागला असून ज्यांनी जग दाखविले त्यांच्यासाठी मरण पत्करावे लागले तरी चालेल; पण मात्या-पित्याचे मुखदर्शन घेणाकरिता पुढे न धजावणारी पिढी येणाऱ्या पिढीला काय संदेश देणार, हा प्रश्न आहे. रस्त्यावर २४ तास सेवा देणारे स्मशानात प्रेत जाळणारे, पोलीस, आरोग्य आणि सफाई कर्मचारी आणि महसुली अधिकाऱ्यांनी काय तुमचे ठेके घेतले रस्त्यावर राहून जीव वाचविण्याचे, अशी चर्चा आहे. स्वार्थापोटी जीवन जगणारी फौज निर्माण झाल्याने सरकारने, सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा कोरोना वॉरियर्स म्हणून पुढे येऊन ही भीती काढणे आणि कोरोनासोबत जगण्याचा मूलमंत्र देणे गरजेचे आहे, अन्यथा माणुसकी कधीचीच संपलेली असेल आणि विदेशी राहणीमानाचा पगडा भारत देशात निर्माण होऊन सुसंस्कृत पिढीला ग्रहण लागल्याशिवाय राहणार नाही, असे आता जुन्या पिढीतील नागरिक बोलू लागले आहेत. तालुक्यातील सामाजिक कार्यकर्तेसुद्धा गायब झाले असून कुणी कुणाला मदतीचा हात देत नाही. आर्थिक टंचाईने प्रत्येक जण जर्जर झाला असून मदतीचा हात देणारे ते हातसुद्धा काळाच्या ओघात लुप्त झालेले आहेत.