13 केंद्रांवर ज्येष्ठांचे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 05:00 IST2021-03-02T05:00:00+5:302021-03-02T05:00:53+5:30
केंद्रीय आरोग्य पथक जिल्ह्यात दाखल झाल्याने सीएस, डीएचओ, व एमओएच यामध्ये व्यस्त असल्याने एकप्रकारे ही महत्त्वाची मोहीम दुर्लक्षित राहीली. ज्येष्ठांना लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करता येते. त्याचप्रमाणे, सेतु केंद्रावरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांची अचूक माहिती प्राप्त होऊन लसीकरण गतीने व्हावे, यासाठी आशा सेविकांकडून माहिती संकलन करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.

13 केंद्रांवर ज्येष्ठांचे कोरोना लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना लसीकरण मोहिमेत फ्रंटलाईन वर्कर्सनंतर आता ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाही सोमवारपासून प्रारंभ झाला. जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग स्कूल येथील लसीकरण केंद्रावर सकाळी सर्वप्रथम ६५ वर्षीय विनोद वितोंडे यांनी लस घेतली. यावेळी ६८ वर्षीय कमलेश बांगड व ६२ वर्षीय सुनीता कमलेश बांगड या दांपत्याचेही लसीकरण झाले.
केंद्रीय आरोग्य पथक जिल्ह्यात दाखल झाल्याने सीएस, डीएचओ, व एमओएच यामध्ये व्यस्त असल्याने एकप्रकारे ही महत्त्वाची मोहीम दुर्लक्षित राहीली. ज्येष्ठांना लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करता येते. त्याचप्रमाणे, सेतु केंद्रावरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांची अचूक माहिती प्राप्त होऊन लसीकरण गतीने व्हावे, यासाठी आशा सेविकांकडून माहिती संकलन करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला लसीकरणासंदर्भातील लिंक सोमवारी प्राप्त झाली. या योजनेत ऑनलाईन नोंदणी कशी करायची, याविषयी जिल्हा प्रशासनाद्वारे जागृती नसल्याने अनेक ज्येष्ठांची तारांबळ उडाली. या लसीकरण मोहिमेत सुरुवातीला डॉक्टर, पोलीस, पारिचारिका आदी फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण होत आहे. यानंतरच्या टप्प्यालाही आता सुरुवात झाली असून, यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. लसीकरण गतीने व्हावे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांची अचूक माहिती आशा सेविकांकडून संकलित करण्यात येत असल्याचे डॉ. रणमले यांनी सांगितले.
या केंद्रांवर ज्येष्ठांना लस
जिल्हा रुग्णालयाबरोबरच शहरात पीडीएमसी, दंतचिकित्सा महाविद्यालय तसेच ग्रामीणमध्ये अचलपूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, दर्यापूर, धारणी, मोर्शी, वरूड, तिवसा या तालुक्यांच्या ठिकाणी लसीकरण केंद्रात कोविशिल्ड लस उपलब्ध आहे. इर्विनमधील एका बूथवर कोव्हॅक्सिन लसही देण्यात येत असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. दीपक करंजीकर यांनी सांगितले.
आठ खासगी रुग्णालयांचे प्रस्ताव
प्रमाणित खासगी रुग्णालयांत कोरोना प्रतिबंधक लस अडीचशे रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रुग्णालयांचे प्रस्ताव पाहून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम म्हणाले. जिल्ह्यात लवकरच व्हॅक्सिन प्राप्त होणार आहे. त्यानंतर खासगी केंद्राला ती देऊन लसीकरण सुरू होणार असल्याचे आरोग्य यंत्रणाद्वारे सांगण्यात आले.
कोविन ॲप सुरू, तांत्रिक दोष कायम
कोविन ॲपवर सोमवारपासून नोंदणी सुरू झालेली आहे. स्पॉट रजिस्टेशनही होत आहे. या ॲपवर केंद्रांचे नाव दिसत नसल्याने अनेक ज्येष्ठांना नोंदणी करताना अडचणी आल्यात. आरोग्य यंत्रणेच्याही सॉफ्टवेअरमध्ये अडचणी आल्या. याबाबतची लिंक ही सोमवारी मिळाली असल्याचे आरोग्य यंत्रणाद्वारे सांगण्यात आले.