शंकरबाबांच्या दिव्यांग मुलांना कोरोना संरक्षणाची कवचकुंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:13 IST2021-07-09T11:10:58+5:302021-07-09T11:13:35+5:30
Chandrapur News अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील अनाथांचे नाथ असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्या दिव्यांग तथा मिरगी या आजाराने ग्रस्त असलेल्या १५ मुलांना गुरुवारी कोरोनाची लस देण्यात आली.

शंकरबाबांच्या दिव्यांग मुलांना कोरोना संरक्षणाची कवचकुंडले
इंदल चव्हाण/ नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील अनाथांचे नाथ असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्या दिव्यांग तथा मिरगी या आजाराने ग्रस्त असलेल्या १५ मुलांना गुरुवारी कोरोनाची लस देण्यात आली. सामाजिक भान जपत शंकरबाबा व स्थानिक प्रशासन मुलांच्या लसीकरणासाठी ‘फ्रंटफूट’वर आलेत. त्या दिव्यांगांना कोरोना लसीच्या रूपाने संरक्षक कवचकुंडले दिली. मात्र, त्या मुलांची शासनस्तराववर दखल घेतली जाईल का, हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहे.
वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर बालगृहात १२३ बेवारस दिव्यांग मुले मुली आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाने ७ जून रोजी या बालगृहात येऊन तेथील मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला. पैकी १३ अतितीव्र मिरगीग्रस्त मुलांना लस दिल्यानंतर काही समस्या निर्माण होऊ नये म्हणून लस देण्यात आली नव्हती. दरम्यान, गुरुवारी आरोग्य विभागाच्या वाहनाने त्या १३ मुलांसह अन्य दोन अशा १५ मुलांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. सकाळी ११ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने व त्यांच्या चमूने या मुलांना कोविशिल्डचा पहिला डोस दिला. यावेळी अपंग विभागाचे प्रमोद भक्ते, डॉ. प्रीती मोरे, डॉ. तृप्ती जवादे, डॉ. देवघरे, डॉ. पवन दळणकर, आकाश चव्हाण, वझ्झर संस्थेचे मुख्याध्यापक अनिल पिहुलकर, विशेष शिक्षक नंदकिशोर आकोलकर, केअर टेकर सुभाष काळे, वार्डन वर्षा काळे, किरण केचे, उद्धव जुकरे, मंगेश गुजर, सुषमा मोहिते, युनिस ब्रदर उपस्थित होते. जवळपास सहा तास मुलांना निगराणीत ठेवण्यात आले. त्या मुलांना कुठलाही त्रास न झाल्यामुळे, नाश्ता व फुल देऊन त्यांना आश्रमात रवाना करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी वाढले जेवण
या १५ मुलांना लसीकरणासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांची भेट घेऊन स्वत: जेवण वाढले. भेटवस्तू दिल्यात. त्यांची आस्थेने विचारपूस केली. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर उपस्थित राहिल्याचे समाधान शंकरबाबांनी लोकमतजवळ व्यक्त केले.
वझ्झर संस्थेत ७ जून रोजी लसीकरण शिबिर घेण्यात आले. मात्र, या १५ मुलामुलींना अतितीव्र मिरगीचा आजार असल्याने त्यांच्यावर संशोधन करण्यात आले. त्यानंतर अमरावती येथे कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.
श्यामसुंदर निकम,
जिल्हा शल्य चिकित्सक
आश्रमात मिरगीचा आजार असलेल्या १० मुली व ५ मुले वास्तव्याला आहेत. २० वर्षांपासून त्यांचा सांभाळ मी करीत आहे. माझे वय ८० वर्षे झाले असून, शासनाने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्यायला हवी. त्यांना गुरुवारी अमरावतीला लसीकरणासाठी पाठविले. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांची काळजी घेतल्याने बरे वाटले.
- शंकरबाबा पापळकर,
समाजसुधारक, वझ्झर