मार्च महिन्यात कोरोनाचे १६३ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:13 IST2021-04-02T04:13:32+5:302021-04-02T04:13:32+5:30
अमरावती : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाने १६३ जणांचा बळी घेतला. कोरोनाग्रस्तांच्या कमी-अधिक मृत्यूची दरदिवशी नोंद होत असताना, केवळ २३ ...

मार्च महिन्यात कोरोनाचे १६३ बळी
अमरावती : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाने १६३ जणांचा बळी घेतला. कोरोनाग्रस्तांच्या कमी-अधिक मृत्यूची दरदिवशी नोंद होत असताना, केवळ २३ मार्च रोजी दिलासा मिळाला. या दिवशी कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूची नोंद आरोग्य यंत्रणेकडे झाली नाही. २०२१ मध्ये मार्चपर्यंत एकूण ६४७ कोराेनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संसर्गाची २४ मार्च राेजी वर्षपूर्ती झाली. जिल्ह्यात कोरोना आटोक्यात येत असल्याचे संक्रमित रुग्णांच्या हल्लीच्या कमी संख्येवरून लक्षात येते. पाचशेपुढील संख्येवरून कमी होऊन दरदिवशी २०० ते ४०० दरम्यान कोराेनाग्रस्तांची नोंद होत आहे. खासगी, शासकीय रुग्णालयांत उपचार घेताना कोरोनाने मृत्यू होत असल्याची नोंद आरोग्य प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात ५१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतल्याची माहिती आहे. यात मृतांमध्ये ज्येष्ठांचा समावेश अधिक प्रमाणात होता. ५५ ते ७५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याची आाकडेवारी आहे. आधी विविध व्याधींनी ग्रस्त रुग्णांना कोरोनाने हेरले आणि बळी घेतल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मार्च महिन्यात १ मार्च रोजी १० तर, २ मार्च रोजी १२ बळी कोरोनाने घेतल्याची नोंद आहे. त्यानंतर मार्चअखेरपर्यंत मृत्यूचा आकडा एक अंकी राहिला. तरीही एकूण ३१ दिवसांत १६३ व्यक्ती दगावल्या.
-------------------
मार्चमध्ये आठवडानिहाय कोरोना मृत्यूचा आलेख
१ ते ७ मार्च : ५१
८ ते १५ मार्च : ४३
१६ ते २३ मार्च: ३०
२४ ते ३१ मार्च : ३९
----------------
६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला, हे खरे आहे. कोरोनाचा ज्येष्ठांना जास्त धोका आहे. मात्र, आता लसीकरणावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यासाठी साडेचार लाख लसींची मागणी केली असून, अकोला येथून गुरुवारी रात्री लसी घेऊन वाहन पोहोचेल.
- दिलीप रणमले, जिल्हा आराेग्य अधिकारी, अमरावती.