अचलपुरात घरोघरी कोरोना, अनेकांच्या घरांना कुलूप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:13 IST2021-02-24T04:13:54+5:302021-02-24T04:13:54+5:30

ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशन नाकारले : कोविड सेंटर शहराबाहेर बुरडघाटला परतवाडा : अचलपूर तालुक्यात घरोघरी कोरोना रुग्ण पाहायला मिळत ...

Corona from house to house in Achalpur, many houses locked! | अचलपुरात घरोघरी कोरोना, अनेकांच्या घरांना कुलूप !

अचलपुरात घरोघरी कोरोना, अनेकांच्या घरांना कुलूप !

ज्येष्ठ नागरिकांना होम आयसोलेशन नाकारले : कोविड सेंटर शहराबाहेर बुरडघाटला

परतवाडा : अचलपूर तालुक्यात घरोघरी कोरोना रुग्ण पाहायला मिळत आहेत. यात काही कुटुंबच्या कुटुंबे कोरोनाग्रस्त निघाली आहेत. त्यामुळे ती घरे कुलूपबंद आहेत. अगदी मागील चार-सहा दिवसांपासून त्या घरांना कुलूप आहे. कुटुंबाविषयी, त्यांच्या घरच्यांविषयी माहिती द्यायलाही त्या ठिकाणी कोणी शिल्लक नाही.

तालुक्यात अचलपूर व परतवाडा या शहरी भागासह ग्रामीण क्षेत्रात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमित निघत आहेत. प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ६५ ते ७० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लक्षणे नसलेल्या, पण कोरोना संक्रमीत आढळलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाही होम आयसोलेशन सुविधा नाकारण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून अशा ज्येष्ठांना शहराबाहेर दूरवर असलेल्या बुरघाट येथील कोविड सेंटरला प्रशासनाने नेऊन टाकले आहे.

परतवाडा शहरात २२ फेब्रुवारीला पाच वर्षाखालील चार मुले कोरोना संक्रमित निघाली. यातील दोन सदर बाजार परिसरातील, तर दोन पेन्शनपुऱ्यातील आहेत. यातील दोन लहान मुलांना कोविड सेंटरवर हलविण्याचा पथकाने प्रयत्न केला. पालकांनी पालिका प्रशासनावर संताप व्यक्त केल्यानंतर अखेर त्या मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याची अनुमती देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

बॉक्स

दारूच्या दुकानांवर रांगा

शहरात नागरिकांचा २२ फेब्रुवारी रोजी मुक्त संचार बघायला मिळाला. बाजारपेठेसह भाजीबाजारात सर्वत्र फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. देशी-विदेशी दारूच्या दुकानांवर तळीरामांची चांगलीच गर्दी उसळली होती. यात आठवडाभर पुरेल एवढी दारू विकत घेण्याकडे, घरी नेऊन साठविण्याकडे तळीरामांचा कल बघायला मिळाला.

बॉक्स

स्ट्रेनचा उलगडा नाही

अचलपूर तालुक्याला लक्ष्य करणाऱ्या कोरोनाचा नेमका स्ट्रेन कोणता, याचा अजूनही उलगडा नाही. कोरोना रुग्णांच्या संपर्कात न आलेले नागरिकही कोरोना संक्रमित निघत आहेत. अगदी व्हायरल फिव्हरप्रमाणे घरातील एकापाठोपाठ सर्वांनाच हा कोरोना संक्रमित करीत आहे. प्रशासनाने या स्ट्रेनचा उलगडा करण्याच्या दृष्टीने अजूनही पावले उचललेली नाहीत.

बॉक्स

अचलपूरचे मुख्याधिकारी बदलले

नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी सुमेध अलोने यांची दोन्ही मुले कोरोना संक्रमित निघाले. त्यामुळे ते रजेवर गेले. त्यामुळे मोर्शी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्याकडे प्रभार सोपविण्यात आला आहे. अंजनगाव नगरपालिका मुख्याधिकारीपदाचा तात्पुरता प्रभार दर्यापूरच्या मुख्याधिकारी गीता वंजारी यांच्याकडे सोपविला आहे.

मृत्युसंख्या वाढतीच

अचलपूर नगरपालिका क्षेत्रात कोरोना संक्रमितांची मृत्युसंख्या वाढत आहे. अचलपूर शहरातील सवाईपुरा येथील ७४ वर्षीय कोरोना संक्रमित पुरुषाचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने २२ फेब्रुवारीला दिली. अचलपूर नगरपालिकेतील विद्युत विभागात कार्यरत अभियंत्याचा १९ फेब्रुवारीला अमरावतीलाच उपचारादरम्यान झाला. अचलपूर ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाच्या मृत्यू २० फेब्रुवारीला झाला. सदर बाजारातील एका व्यापाऱ्याचाही मृत्यू झाला. परतवाडा शहरातील सहा कोरोना संक्रमितांच्या मृत्यूची नोंद नगरपालिका प्रशासनाकडे नाही.

--------------------------------

Web Title: Corona from house to house in Achalpur, many houses locked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.