कोरोनाचा मंगल कार्यालयांसह वर-वधूपक्षाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:45+5:302021-03-04T04:22:45+5:30

परतवाडा : कोरोनाचा वाढता प्रभाव आणि वाढती रुग्णसंख्या, लॉनडाऊन व संचारबंदीमुळे नियोजित वर-वधूंनी विवाह सोहळा पुढे ढकलला आहे. काहींना ...

Corona hits the bride-to-be with Mars offices | कोरोनाचा मंगल कार्यालयांसह वर-वधूपक्षाला फटका

कोरोनाचा मंगल कार्यालयांसह वर-वधूपक्षाला फटका

परतवाडा : कोरोनाचा वाढता प्रभाव आणि वाढती रुग्णसंख्या, लॉनडाऊन व संचारबंदीमुळे नियोजित वर-वधूंनी विवाह सोहळा पुढे ढकलला आहे. काहींना तर पुढे ढकलावी लागली आहे. याचा फटका वर-वधुपक्षांसह मंगल कार्यालयांनाही बसला आहे. ३ ते ८ मार्च दरम्यान दाट विवाह तिथी आहेत. त्या पुढे १५ मार्चपर्यंतही आहेत. या अनुषंगाने लग्न जुळलेल्यांनी त्या-त्या तारखेचे नियोजन महिनाभरापूर्वीच करून ठेवले. मंगल कार्यालयही बूक केले. नातेवाइकांना निमंत्रणही दिले. घोडा, बँडबाजा आणि फटाक्यांचीही तयारी केली. पण, कोरोनामुळे या अतिउत्साही मंडळींचा उत्साहच मावळला.

मंगल कार्यालय व सोहळ्याच्या नियोजनानुसार केवळ २५ लोकांचीच मिळत असलेली परवानगी बघता, वर-वधुपित्यांनी त्या मंगल कार्यालयाकडेच धाव घेतली. आम्हाला सहकार्य करा. आम्ही लग्न पुढे ढकलत आहोत. एप्रिल महिन्यात आम्हाला मंगल कार्यालय उपलब्ध करून द्यावे, अशी विनवनी त्यांनी केली. काहींनी ही विनवणी मान्य केली, तर काहींनी यास स्पष्ट नकार दिला. पुढचे पुढे बघू, असेही त्यांना सुचविले.

दरम्यान, जी मंगल कार्यालये कंटेनमेंट झोनमध्ये येतात, त्यांना प्रशासनाकडून २५ लोकांनाही परवानगी नाकारली गेली आहे. तेथे ३ मार्चला होणारे सर्व विवाह सोहळे रद्द झाले आहेत. पुढे ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे हीच परिस्थिती राहणार आहे.

बॉक्स

कोरोनाचा कहर

कोरोनाच्या कहरात वर, वधूसह निकटचे नातेवाईकही कोरोना संक्रमित निघाले आहेत. कुठे वर-वधुपिता, तर कुठे खुद्द वर-वधू उपचारार्थ कोविड रुग्णालयात दाखल आहेत. यातच त्यांच्या लग्नाची तिथी निघून गेली, तर काहींना होम क्वारंटाईनने अडचणीत टाकले आहे.

कोट

कंटेनमेंट झोनमुळे ३ मार्चचे मंगल कार्यालयातील मंगल सोहळे पुढे ढकलण्यात आले. कंटेनमेंट झोनमध्ये २५ लोकांनाही परवानगी नाही. लॉकडाऊनचा मोठा फटका मंगल कार्यालयांना बसत आहे.

- प्रवीण चौधरी, मंगल कार्यालय संचालक, देवमाळी

Web Title: Corona hits the bride-to-be with Mars offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.