पुन्हा कोरोना कहर, बुधवारी 359 पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:01 IST2021-02-11T05:00:00+5:302021-02-11T05:01:02+5:30
१ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२१ या दरम्यान दरदिवशी कोरोना संक्रमितांची संख्या वाढती आहे. त्रिसूत्रीचे पालन करा, एवढ्यावरच प्रशासनाची जनजागृती सुरू आहे. मात्र, नागरिकांना कर्तव्याची जाणीव आणि कोरोना नियमांचे पालन करावे, यासाठी ठोस पावले उचलली जात नाही, असा जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनाचा ढिम्म कारभार सुरू आहे. कोरोना लस आली नि बेपर्वाई झाली, असे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वागणे आहे.

पुन्हा कोरोना कहर, बुधवारी 359 पॉझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. बुधवारी ३५९ संक्रमित रुग्ण आढळल्याची नोंद झाली. हा नवीन वर्षात कोरोनाचा ‘ब्लास्ट’ ठरला आहे. कोरोना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून फारशा उपाययोजना करण्यात येत नाही. रविवारी झालेल्या केंद्रीय आरोग्य पथकाच्या दौऱ्यानंतरही काहीच सुधारणा नाही, हे स्पष्ट झाले. गत १० दिवसांत २ हजार १९ संक्रमित रुग्ण आढळले आहेत.
१ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२१ या दरम्यान दरदिवशी कोरोना संक्रमितांची संख्या वाढती आहे. त्रिसूत्रीचे पालन करा, एवढ्यावरच प्रशासनाची जनजागृती सुरू आहे. मात्र, नागरिकांना कर्तव्याची जाणीव आणि कोरोना नियमांचे पालन करावे, यासाठी ठोस पावले उचलली जात नाही, असा जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासनाचा ढिम्म कारभार सुरू आहे. कोरोना लस आली नि बेपर्वाई झाली, असे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वागणे आहे. राज्यात १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग कायम असून, यात अमरावती जिल्हा आघाडीवर असताना प्रशासन नेमके काय करीत आहे, हे अनाकलनीय आहे.
संक्रमित रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढत आहे. नवीन वर्षात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही ठोस उपाययाेजना केल्या नाहीत. केवळ कागदोपत्री आढावा, बैठकी, अहवाल इतकीच प्रशासकीय खानापूर्ती सुरू आहे. आतापर्यंत २३ हजार ८३५ संक्रमितांची संख्या आणि ४२७ जणांचा बळी गेले असताना जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर का नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
१० रुग्णालयांत उपचाराची सुविधा
संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने १० रुग्णालयांची सुविधा केली आहे. यात अंबादेवी दवाखाना, ॲक्झाॅन हाॅस्पिटल, बेस्ट हॉस्पिटल, दयासागर दवाखाना, नांदगाव खंडेश्वर येथील ट्रामा केअर सेंटर, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय दवाखाना, हिल टॉप कोविड हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अचलपूर ट्रामा केअर सेंटर, अमरावती येथील महावीर हॉस्पिटलचा समावेश आहे.
२० पथके आहे कुठे?
वार्षिक नियोजन आढावा बैठकीच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात २० पथके जाहीर केली. ना. पवार परत जाताच ना पथक, ना कारवाई असा कारभार सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी केवळ पथके गठित झाल्याचे जाहीर करून जिल्हा प्रशासनाने वेळ मारून नेली, हे आता स्पष्ट झाले.