धारणीच्या शासकीय कार्यालयात कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST2021-03-04T04:22:11+5:302021-03-04T04:22:11+5:30
बेफिकिरी कारणीभूत : त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीला फाटा धारणी : मेळघाटची आर्थिक राजधानी अशी ओळख प्राप्त असलेल्या धारणी शहरावर कोरोना विषाणूने ...

धारणीच्या शासकीय कार्यालयात कोरोनाचा उद्रेक
बेफिकिरी कारणीभूत : त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीला फाटा
धारणी : मेळघाटची आर्थिक राजधानी अशी ओळख प्राप्त असलेल्या धारणी शहरावर कोरोना विषाणूने आक्रमण केले आहे. महिन्याभरापासून तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि आता आरोग्य विभाग या विषाणूच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाकडून शासकीय कार्यालयांवर कोरोना विषाणूच्या अनुषंगाने अतिदक्षता घेण्याची आवश्यकता आहे.
धारणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय वगळता इतर सर्व कार्यालयांमध्ये कोरोना विषाणूसंदर्भात कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्यामुळे या विषाणूचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. ग्रामपंचायत निवडणूक आटोपल्यानंतर दहा दिवसांतच तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार आणि इतर कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारीदेखील कोेरोनाच्या कचाट्यात सापडले.
गत आठवड्यात पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. आता दोन दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाने विळख्यात घेतले असून, याच रुग्णालयात रविवारी एका पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्याने याची भीषणता वाढली आहे. धारणी तालुक्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, पाहिजे त्या प्रमाणात नागरिक दक्षता घेत नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सतर्कता बाळगली जात नसल्याचे वास्तव आहे.
कॅप्शन : धारणी येथील एसबीआयसमोर सोमवारी ग्राहकांची अशी गर्दी होती.
------------------------------------