कोरोनाचा डंख, ४६७ महिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:09 IST2021-06-03T04:09:59+5:302021-06-03T04:09:59+5:30
गजानन मोहोड अमरावती : कोरोनाला हलक्यात घेणे चांगलेच महागात पडू शकते, याचा प्रत्यय आता येत आहे. जिल्ह्यात ३१ मेपर्यंत ...

कोरोनाचा डंख, ४६७ महिलांचा मृत्यू
गजानन मोहोड
अमरावती : कोरोनाला हलक्यात घेणे चांगलेच महागात पडू शकते, याचा प्रत्यय आता येत आहे. जिल्ह्यात ३१ मेपर्यंत ९२,१४८ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला व यामध्ये ४६७ महिला व ९८७ पुरुष उपचारादरम्यान दगावल्याची नोंद धक्कादायक आहे. मृतांमध्ये ७६३ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना काळात ज्येष्ठांनी घराबाहेर पडणे धोकादायक मानल्या जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक ब्लास्ट दुसऱ्या लाटेत झाला. यामध्ये ७०,४६९ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. याशिवाय १,०४३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची आरोग्य विभागाची नोंद आहे. यापूर्वी पहिल्या लाटेत सप्टेंबर महिन्यात ७,७१३ कोरोनाग्रस्त व १५४ रुग्णांचा मृत्यू झालेला होता. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट दीर्घकाळ म्हणजेच चार महिने जिल्ह्यात राहिली. यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्थाच मोडकळीस आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ४ एप्रिल २०२० रोजी नोंद झाला. हा रुग्ण होमडेथ होता. या महिन्यात तीन ज्येष्ठ महिला व ७ ज्येष्ठांचा मृत्यू झाला व यामध्ये आठ होमडेथ होत्या. या महिन्यात जिल्ह्यात आठ टक्के मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक ठरल्यानंतर मृतांचे स्वॅब घेण्याऐवजी परिवारातील हाय रिस्कच्या नागरिकांचे स्वॅब घेण्यास सुरुवात झाली. यानंतर पहिल्या लाटेत ऑगस्ट महिन्यात ५१ परुष व १३ महिला व सप्टेंबर महिन्यात ११५ पुरुष व ३९ महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. याशिवाय दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी महिन्यात ७४ पुरुष व १९ महिला, मार्च महिन्यात ११५ पुरुष ४८ महिला, एप्रिल महिन्यात १९२ पुरुष ९१ महिला याशिवाय आतापर्यतचे सर्वाधिक ३०८ पुरुष १८९ महिलांचा मे महिन्यात मृत्यू झालेला आहे.
पाईंटर
महिना व लिंगनिहाय संक्रमितांचे मृत्यू
महिना पुरुष महिला
एप्रिल २०२० ०३ ०७
मे ०३ ०२
जून ०४ ०५
जुलै ३१ ०९
ऑगस्ट ५१ २३
सप्टेंबर ११५ ३९
ऑक्टोबर ५१ २१
नोव्हेंबर ०९ ०५
डिसेंबर १५ ०३
जानेवारी २०२१ १६ ०६
फेब्रुवारी ७४ १९
मार्च ११५ ४८
एप्रिल १९२ ९१
मे ३०८ १८९
बॉक्स
दुसऱ्या लाटेत ३४७ महिलांचा मृत्यू
जिल्ह्यात मे महिन्याअखेरपर्यंत १४५४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. यात दुसऱ्या लाटेत १,४५४ संक्रमितांचा मृत्यू झाला. यात ६८९ पुरुष व ३४७ महिलांचा समावेश आहे. यातही मे महिन्यात सर्वाधिक ब्लास्ट झाला. यात ३०८ पुरुष व १८९ महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. यामध्ये ६० वर्षांवरील १५८ पुरुष ८० महिलांचा समावेश आहे.
बॉक्स
४० वर्षांआतील ४० महिलांचा मृत्यू
कोरोना काळात जिल्ह्यात २० ते ४० या वयोगटातील ४० महिला व ९२ महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. याशिवाय २० वर्षांआतील एक तरुणी व १० वर्षांआतील दोन बालिका व एक बालकाचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता राज्याच्या टास्क फोर्सने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
बॉक्स
१२८ तरुणाईचा मृत्यू
कोरोना संक्रमणात १२८ तरुणाईचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. यात ९१ पुरुष व ३७ महिलांचा समावेश आहे. यात एप्रिल महिन्यात सर्वाधिक २७ तरुण, तर ९ महिला व मे महिन्यात ३० तरुण व १२ महिलांचा संसर्गाने बळी घेतला. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियम व त्रिसूत्रीचे पालन करणे महत्त्वाचे ठरत आहे.
बॉक्स
८० टक्के मृतांना अन्य आजारही
जिल्ह्यात मृत कोरोना संक्रमितांपैकी ८० टक्के रुग्णांना मधुमेह, रक्तदाब यासारखे १६ आजार असल्याचे डेथ ऑडिटमध्ये उघड झाले आहे. कोमार्बिडीटी आजाराच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते व या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास हा घातक ठरतो. याशिवाय अंगावर दुखणे काढणे, उशिराने चाचण्या करणेदेखील मृत्यूचे कारण ठरत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.