कोरोना,११ मृत्यू, ५२० पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:43+5:302021-04-22T04:13:43+5:30
अमरावती : कोरोना संसर्गात बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. बुधवारी पुन्हा ११ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात नऊ मृत ...

कोरोना,११ मृत्यू, ५२० पॉझिटिव्ह
अमरावती : कोरोना संसर्गात बाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. बुधवारी पुन्हा ११ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात नऊ मृत जिल्ह्यातील, तर दोन नागपूरमधील आहेत. जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूची संख्या ८१३ झालेली आहे. याशिवाय ५२० नव्या रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५८,३८५ झालेली आहे.
जिल्ह्यात बुधवारी ३,१०८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ५२० अहवाल पॉझिटिव्ह व १६.७३ टक्के पॉझिटिव्हची नोंद झालेली आहे. दोन दिवसांत चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण पुन्हा वाढायला लागले आहे. ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकानांचा अवधी चार तासांवर आणला, तरीही रस्त्यांवरची गर्दी कमी होत नाही. त्यामुळे अमरावतीला पाचही झोनमध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे. यात आतापर्यंत दीड हजारांच्या चाचण्या करण्यात आल्या व यात ३५ वर नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना उपचारार्थ कोरोना केअर सेंटरमध्ये भरती करण्यात आलेले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी बैठक घेऊन कुठलाही ताप असो, डॉक्टरांनी रुग्णाची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
बॉक्स
२४ तासांतील कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
जिल्ह्यात २४ तासांत उपचारादरम्यान येथील ६० वर्षीय पुरुष, (उत्तम नगर), ५५ वर्षीय पुरुष, (गौरखेडा, नांदगाव खंडेश्वर), ७५ वर्षीय पुरुष, (बैतुल), ६० वर्षीय महिला, (कारंजा घाडगे), ५२ वर्षीय महिला, (धामणगाव रेल्वे), ६५ वर्षीय पुरुष, (मोर्शी), ३० वर्षीय महिला, (कठोरा), ७५ वर्षीय पुरुष, (सावरडी), ६० वर्षीय महिला, (भातकुली) याशिवाय नागपूर जिल्ह्यातील ७५ वर्षीय महिला, (काटोल) व ६० वर्षीय पुरुष (काटोल) या रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
बॉक्स
कोरोना जिल्हास्थिती
जिल्ह्यात उपचारानंतर बरे वाटल्याने ४५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. आतापर्यत ५८,३८५ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहे. ही ८२.५२ टक्केवारी आहे. सद्यस्थितीत ५,८८९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यात महापालिका क्षेत्रात २,१८२ व जिल्हा ग्रामीणमध्ये ३,६५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर मृत्यूदर १.३९ टक्के असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितले.