कर्जमुक्तीसाठी महिला एकवटल्या
By Admin | Updated: March 16, 2017 00:13 IST2017-03-16T00:13:12+5:302017-03-16T00:13:12+5:30
खासगी मायक्रो फायनान्सच्या कर्जातून कायमस्वरूपी मुक्त करावे यासह अन्य मागण्यांसाठी ...

कर्जमुक्तीसाठी महिला एकवटल्या
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महिला फेडरेशनची मागणी
अमरावती : खासगी मायक्रो फायनान्सच्या कर्जातून कायमस्वरूपी मुक्त करावे यासह अन्य मागण्यांसाठी बुधवारी भारतीय महिला फेडरेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना देण्यात आले.
महिलांवरील मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करावे, वसुलीसाठी दडपण आणणाऱ्या एजंटावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, शेतकरी व महिला शेतकऱ्यावरील सर्व कर्ज माफ करावे, राष्ट्रीयकृत बँकांचे महिला बचत गटावरील कर्ज माफ करावे,महिला बचत गटांना चार टक्के व्याजाने नवीन कर्ज देण्यात यावे, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजुरांना पेंशन कायदा लागू करावा व दरमहा पाच हजार रूपये पेंशन द्यावी.
शेतमालाला भाव मिळण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, प्रत्येक सरकारी योजनांची माहिती ग्रामसभेमध्ये देण्यात यावी व गरजूंना लाभ द्यावा, मनरेगाची कामे सुरू करून त्यात महिलांना समावून घ्यावे महिलांचे आरोग्य व मुलांचे शिक्षण यासाठी सरकारी बजेटमध्ये वाढ करावी आदी मागण्यासाठी जिल्हा कचेरीसमोर महिलांनी शासनाचा लक्षवेध केला. यावेळी क्रांती देशमुख, सोनाली नवले, संगीता जगाते, प्रतिभा पाळेवर, ज्योती वानखडे, ममता गवई, हिरा गजभिये, वर्षा पागोटे आदी भारतीय महिला फेडरेशनच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)