अचलपूर बाजार समितीवर सहकार पॅनेलचा झेंडा
By Admin | Updated: July 29, 2015 00:22 IST2015-07-29T00:22:15+5:302015-07-29T00:22:15+5:30
अचलपूर बाजार समितीच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली.

अचलपूर बाजार समितीवर सहकार पॅनेलचा झेंडा
१५ जागांचे निकाल जाहीर : दोन जागांचे निकाल थांबविण्यात आले
अचलपूर : अचलपूर बाजार समितीच्या १५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. यात नऊ जागांवर सहकार पॅनेलचे उमेदवार निवडून आलेत. सहा जागांवर समता पॅनेलच्या उमेदवारांनी बाजी मारली. दोन जागांचा निकाल न्यायालयाच्या निर्णयाने थांबविण्यात आले, तर एका उमेदवाराची अविरोध निवड करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध मतदारसंघांच्या १८ जागांसाठी एकूण ४१ उमेदवार रिंंगणात होते. सोमवारी बाजार समितीच्या चिली गोदामात मतगणना झाली. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सेवा सहकारी मतदारसंघातून अजय मधुकर पाटील (समता पॅनेल), विजय अजाबराव काळे (सहकार पॅनेल), बाबूराव नारायणराव गावंडे (सहकार पॅनेल), गोपाल वासुदेव लहाने (समता पॅनेल), गजानन प्रल्हाद भोरे (समता पॅनेल), अमोल मुरलीधर चिमोटे (सहकार पॅनेल) आणि दीपक माधवराव पाटील (सहकार पॅनेल) हे निवडून आले.
सेवा सहकारी मतदारसंघात सात जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक रिंंगणात होते. सेवा सहकारी महिला राखीव मतदारसंघातून वर्षा नरेंद्र पवित्रकार (सहकार पॅनेल), किरण दिलीप शेळके (समता पॅनेल) या विजयी झाल्यात. दोन जागांसाठी चार उमेदवार रिंंगणात होते. सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून गंगाधर रामकृष्ण चौधरी (सहकार पॅनेल) विजयी ठरले. सेवा सहकारी विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदारसंघातून गंगाराम शंभुजी काळे (समता पॅनेल) यांचा विजय झाला. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून सहकार पॅनेलचे राजेंद्र रामराव गोरले व समता पॅनेलचे मनोहर शंकर जाधव यांचा विजय झाला. ग्रा.पं. अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून सहकार पॅनेलचे आनंद विश्वनाथ गायकवाड यांचा विजय झाला. हमाल तोलारी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे महादेव दशरथ घोडेराव यांचा विजय झाला.
तीन जागांसाठी पुनर्मतमोजणी
बाजार समितीच्या विविध मतदारसंघांतील तीन जागांसाठी पुनर्मतमोजणी करण्यात आली. त्यात ग्रामपंचायत सर्वसाधारण जागेसाठी समता पॅनेलचे उमेदवार मनोहर जाधव यांना २८४ मते मिळाली होती. सहकार पॅनेलचे उमेदवार अजय उभाड यांना २८० मते मिळाल्याने त्यांनी पुनर्मतजोणीची मागणी केली. त्यात मनोहर जाधव यांची २ मते वाढल्याने २८६ मते झाली. ग्रामपंचायत अनुसूचित जमाती मतदारसंघात सहकार पॅनेलचे आनंद गायकवाड यांना २६७ तर सहकार पॅनेलच्या सुषमा भारत थोरात यांना २६५ मते मिळाली. पुनर्मतमोजणीत समता पॅनेलचे दिलीप प्रल्हाद अपाले यांना २८० व सहकार पॅनेलचे दीपक माधव पाटील यांनाही २८० अशी समसमान मते मिळाल्याने पुनर्मतमोजणी झाली. त्यामध्ये दीपक पाटील यांना ३ मते अधिक असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
सहकार पॅनेलचे वर्चस्व
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या २५ वर्षांपासून समता पॅनेलचे वर्चस्व होते. यंदा निवडणूक चुरशीची झाल्याने काही जागांवरील उमेदवारांना अल्प मतांनी पराभव पत्करावा लागला. अचलपूर बाजार समितीवर यंदा परिवर्तन होणार असल्याचे भाकित ‘लोकमत’ने केले होते. हा अंदाज खरा ठरला.
आठ तास लागले मतमोजणीला
बाजार समितीच्या १५ जागांसाठी मतमोजणी करण्यात आली. सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या या मतमोजणीचा शेवटचा निकाल सायंकाळी ४ वाजता बाहेर आला. मतमोजणी व निवडणूक निर्णय अधिकारी राजेश भुयार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय पांडे, एच.ई. गावंडे, दीपक चांभारे, विजय अंबाडेकर, मनोज डहाळे, अविनाश महल्ले, दीपक कोरडे यांनी जबाबदारी सांभाळली.
अवैध मतांची संख्या अधिक
या निवडणुकीत अवैध मतांची संख्या अधिक होती. त्यामध्ये सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वसाधारण जागेत ४३, इतर ओबीसी ४८, महिला राखीव २८, विमुक्त जाती ३६, अनुसूचित जमाती ८०, ग्रामपंचायत सर्वसाधारण ४२ असे व हमाल तोलारी मतदारसंघामध्ये ९ अशी मते अवैध ठरली. यावरून हमाल-तोलारी मतदारसंघ सर्वाधित सुज्ञ ठरला.