प्रचाराचा पारंपरिक बाज हरपला
By Admin | Updated: October 6, 2014 23:05 IST2014-10-06T23:05:38+5:302014-10-06T23:05:38+5:30
प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा ट्रेंड बदलू लागला आहे. दिवसागणिक प्रचाराची यंत्रणा हायटेक होऊ लागल्याने जमिनीवरची रंगत हरपली आहे. यामध्ये पूर्वी अनुभवाला येणारी रणधुमाळी, गगनभेदी घोषणा काळाच्या

प्रचाराचा पारंपरिक बाज हरपला
गजानन मोहोड - अमरावती
प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा ट्रेंड बदलू लागला आहे. दिवसागणिक प्रचाराची यंत्रणा हायटेक होऊ लागल्याने जमिनीवरची रंगत हरपली आहे. यामध्ये पूर्वी अनुभवाला येणारी रणधुमाळी, गगनभेदी घोषणा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत.
येऊन येऊन येणार कोण?
आमच्याशिवाय हायेच कोण,
ताई बाई अक्का,
विचार करा पक्का.... वरच माया शिक्का, अशा घोषणा आता निवडणूक प्रचारातून बंद झाल्यात. मतदान यंत्रामुळे (ईव्हीएम) शिक्का शब्द कालबाह्य झाला. या सर्व प्रकारांची जागा आता इंटरनेट, फेसबूक, टष्ट्वीटर या हायटेक प्रचार माध्यमांनी घेतल्याने प्रचाराचा पारंपरिक बाज यात हरपला आहे.
निवडणूक म्हटली की, रणधुमाळी आलीच. पूर्वी उमेदवारांची रॅली म्हटली की, विरोधकांची खिल्ली उडवीत स्वत:चे कर्तव्य सिद्ध करणाऱ्या गगनभेदी घोषणा परिसर दणाणून सोडायच्या. आपलीच पार्टी किती शक्तिशाली आहे याचा गौरव घोषणांनी व्हायचा. आता यावर आदर्श आचारसंहितेने बंधने घातली आहेत. तसे पाहता राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार यांच्या मुसक्या निवडणूक आचारसंहितेने आवळल्या आहेत. पैशाच्या वारेमाप उधळपट्टीवर आता लगाम घातला गेला आहे. निवडणुकीमध्ये पूर्वी जो प्रचाराचा जोश होता तो आता राहिला नाही. यामुळे कार्यकर्त्यांध्येदेखील निरूत्साह आहे.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच आधी उमेदवार निश्चित होत होते. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी कित्येक दिवस अगोदर सुरू व्हायची. यावेळीही विधानसभा निवडणुकीत नामांकन भरण्याच्या अंतिम दिवशी महायुती व आघाडी यांच्या घटकपक्षात ताटातुट झाली. स्वबळावर लढण्याचे पावित्र्याने ऐनवेळी उमेदवार जाहीर केल्या गेले. बोटावर मोजण्याईतकेही दिवस प्रचाराला मिळत आहेत. अंतिम क्षणात विरोधकांवर कुरघोडी करून उमेदवार बदलविण्याच्या राजकीय पक्षाच्या धोरणामुळेही प्रचाराचा पारंपारिक बाज हरपला आहे.
पूर्वीच्या निवडणुकीत गावातील दर्शनी भागावरील भिंती या प्रचारार्थ रंगविल्या जायच्या. त्याची जागा आता होर्डींग, फ्लेक्स व कटआऊटने घेतली आहे. पूर्वी गावातील पेंटरचा उपयोग भिंती रंगविण्यासाठी केला जायचा. आता निडणूक प्रचारापासून तर मतदानापर्यंत ईलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.