चांदूरबाजार पालिकेच्या गोदामावर व्यापाऱ्याचा ताबा
By Admin | Updated: November 11, 2014 22:32 IST2014-11-11T22:32:19+5:302014-11-11T22:32:19+5:30
स्थानिक नगरपरिषदेच्या जुन्या कार्यालयाच्या बाजूला असलेले पालिकेच्या मालकीचे टीन शेडमधील गोदामात सध्या एका व्यापाऱ्याने आपले दुकानाचे साहित्य साठवून अवैध ताबा मिळविला आहे.

चांदूरबाजार पालिकेच्या गोदामावर व्यापाऱ्याचा ताबा
चांदूरबाजार : स्थानिक नगरपरिषदेच्या जुन्या कार्यालयाच्या बाजूला असलेले पालिकेच्या मालकीचे टीन शेडमधील गोदामात सध्या एका व्यापाऱ्याने आपले दुकानाचे साहित्य साठवून अवैध ताबा मिळविला आहे. तसेच या गोदामाला स्वत:चे कुलूप ठोकल्याचे प्रकरण चर्चेचा विषय ठरले आहे. या चर्चेची दखल घेत सत्तारुढ गटाच्या गोपाल तिरमारे या नगरसेवकाने नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिक नगरपरिषदेत सद्या प्रहारची सत्ता आहे. प्रहारचे सर्वेसर्वा आ. बच्चू कडू यांनी येथील कार्यक्षेत्रात कोट्यावधीचा निधी देऊन गल्लीबोळातील रस्ते, नाल्यासह स्मशान व चौकाचे सौंदर्यीकरण करवून घेतले. मात्र शहरातील अवैध अतिक्रमणामुळे या विकासाचे तीनतेरा झाले आहे. अशातच चक्क गोडावून व त्यातील जागेचा व्यापाऱ्याने घेतलेल्या अवैध ताब्यामुळे नगरपरिषदेच्या प्रशासनात नेमके काय चालले आहे असा प्रश्न आता सामान्य नागरिकासमोर निर्माण झाला आहे.
आठवडीबाजार ओळीत नगरपरिषदेची जुन्या कार्यालयाची इमारत आहे. त्याचे पश्चिमेकडे टिनशेड नं. २ मध्ये ३० बाय ४० फुटाच्या जागेवर गोडावून उभारण्यात आले. यात जकात वसुलीचे काळात व्यापाऱ्याचा माल साठवण्यात येत होता. जकात वसुली बंद झाल्यावर या गोडावूनमध्ये पालिकेच्या मालकीचे साहित्य ठेवले होते. कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आज जुनी इमारत व गोडावूनच्या सभोवताल छोट्या दुकानदारांनी अतिक्रमण करून जुने कार्यालय व गोडावूनला घेरुन घेतले आहे. या काळात येथीलच एका व्यापाऱ्याने या गोडावूनमधील जुने साहित्य काढून त्यात आपला माल भरला व अवैध ताबा घेऊन गोडावून वापरण्याला सुरूवात केली.
या बाबीची दखल पालिकेच्या कर विभागाचे कर निरीक्षकांनी घेणे अपेक्षित असताना त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. याबाबत गोपाल तिरमारे यांनी त्यांना विचारणा केली असता गोलमाल उत्तर देऊन प्रकरण टाळण्याचा प्रयत्न केल्याचे तिरमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.