लेखा विभागातील ‘बजबजपुरी’वर नियंत्रण

By Admin | Updated: March 5, 2017 00:10 IST2017-03-05T00:10:49+5:302017-03-05T00:10:49+5:30

दैनंदिन स्वच्छता देयके प्रदान करतानाची भली मोठी साखळी संपुष्टात आणल्यानंतर आयुक्तांनी आता ‘लेखा’ विभागावर नजर रोखली आहे.

Control over 'Bajjajpuri' in the accounting division | लेखा विभागातील ‘बजबजपुरी’वर नियंत्रण

लेखा विभागातील ‘बजबजपुरी’वर नियंत्रण

साखळी तोडण्याचे निर्देश : चिपकुची बदली होणार
अमरावती : दैनंदिन स्वच्छता देयके प्रदान करतानाची भली मोठी साखळी संपुष्टात आणल्यानंतर आयुक्तांनी आता ‘लेखा’ विभागावर नजर रोखली आहे. लेखा विभागातील साखळी ब्रेक करण्याच्या सूचना मुख्य लेखाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ही साखळी केव्हा ‘बे्रक’ केली जाते, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लेखा विभागात टक्केवारीच्या बजबजपुरीबाबत नेहमीच बोलले जाते. फाईलवर टेबलागणिक वजन ठेवल्याशिवाय बिल निघतच नाही, असा येथे प्रत्येकाचा अनुभव आहे. वर्षानुवर्षे तेच कर्मचारी लेखा विभागात ठिया मांडून बसल्याने प्रसंगी ते विभागप्रमुखांनाही जुमानत नाहीत. संबंधित कंत्राटदार किंवा जो कुणी महापालिकेचे काम करतो, त्याला साखळीत राहूनच आपले काम काढून घ्यावे लागते. प्रसंगी ‘बिदागी’ न देता फाईल क्लियर करण्याचा प्रयत्न झाल्यास ‘अभिप्राय आणि त्रुटी’ अशी अस्त्र बाहेर काढली जातात. लेखा विभागात कोणत्या टेबलवर किती बिदागी द्यावी लागते, हे जगजाहीर झाले आहे. आरोग्य विभागाप्रमाणे लेखा विभागातही फाईलचा प्रवासाची साखळी मोठी असल्याने आयुक्तांच्या मते अशा फाईल्वर देयके प्रलंबित राहतात. त्यांच्याच निरीक्षणानुसार ही साखळी संपुष्टात येणार आहे. आरोग्य विभागातील साखळी ब्रेक केल्यानंतर कंत्राटदार आणि सुजाण अधिकारी-कर्मचाऱ्यांना आयुक्तांकडून धडाकेबाज निर्णयाची अपेक्षा आहे, कार्यालयीन परिपत्रक काढून आयुक्तांनी लेखा विभागातील साखळी तोडण्याचे संकेत दिले आहेत. लेखा विभागात ठिय्या मांडून बसलेला एक लिपिक फाईल चालविण्याचे व अन्य एका प्रभारी पदासाठी वेगवेगळी आर्थिक बिदागी घेत असल्याची चर्चा वजा आक्षेप महापालिकेत कर्णोपकर्णी झाला आहे. अनेक विभागप्रमुख त्या खास कर्मचाऱ्याबाबत उघडपणे बोलतात.

'त्या' कर्मचाऱ्यांच्या बदल्या केव्हा ?
एखाद्या ठिकाणी अवघे सहा महिने किंवा अडीच वर्षे झाले असतानाही आमच्या बदल्या करण्यात आल्या. मग एकाच ठिकाणी २०-२५ वर्षे असलेल्यांची बदली का नाही? करा ना त्यांचा बदल्या असा सूर कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होतो आहे.

२७ वर्षांपासून लेखा विभागातच
लेखा विभागातील साखळी तोडायची असेल तर ठिय्या मांडणाऱ्यांची बदली करण्याची अपेक्षा कर्तव्यदक्ष आयुक्तांकडे व्यक्त करण्यात आली. एक कर्मचारी तब्बल २७ वर्षांपासून लेखा विभागातील फाईल हाताळतो आहे. त्यामुळे लेखाविभागातील साखळी तोडायची असेल तर २७ आणि १०-१० वर्षांपासून ठिय्या देणाऱ्यांची बदली आयुक्त करतील का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे. तराळे नामक कर्मचारी लेखा विभागात २७ वर्षांपासून असल्याची माहिती महापालिका कर्मचाऱ्यांनी दिली आहे. मिराणी नामक कर्मचाऱ्याची अनेक वर्षांपासून बदली झालेली नाही.

आरोग्य विभागाप्रमाणे लेखा विभागातील साखळी तोडण्यासंदर्भात मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना निर्देश दिले आहेत. लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल. याशिवाय वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या विचाराधीन आहेत.
- हेमंतकुमार पवार, आयुक्त, महापालिका

Web Title: Control over 'Bajjajpuri' in the accounting division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.