अंशदान निवृत्ती वेतनाला विरोध
By Admin | Updated: November 17, 2015 00:27 IST2015-11-17T00:27:02+5:302015-11-17T00:27:02+5:30
अंशदान निवृत्ती वेतन योजनेंतर्गत मासिक वेतनातून कपात केलेल्या रकमांची विवरणपत्रे योजना व कपात सुरू झाल्यपासून शिक्षकांना आजतागायत दिली गेली नाही.

अंशदान निवृत्ती वेतनाला विरोध
आंदोलनाचा इशारा : प्राथमिक शिक्षक समितीचा एल्गार
अमरावती : अंशदान निवृत्ती वेतन योजनेंतर्गत मासिक वेतनातून कपात केलेल्या रकमांची विवरणपत्रे योजना व कपात सुरू झाल्यपासून शिक्षकांना आजतागायत दिली गेली नाही. ही विवरणपत्रे देण्यासाठी केलेल्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आंदोलन केले जाणार आहे.
१ नोव्हेंबर २००५ पासून नोकरीत आलेल्या कर्मचारी शिक्षकांसाठी असणारी निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्तीवेतन योजना तसेच भविष्य निर्वाह निधी योजना बंद करून अंशदान निवृत्ती योजना लागू केली. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी शिक्षण सेवक म्हणून असलेल्या व त्यानंतर नियमित वेतन श्रेणीत कायम झालेल्या शिक्षकाननाही शासनाने जुनी पेन्शन योजना लागू केली नाही. त्याऐवजी त्यांना अंशदान योजनेत ढकलून दरमहा वेतनाच्या १० टक्के कपात सुरू केली. त्याविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुंबई खंडपीठात याचिकाही दाखल केली होती. १९ नोव्हेंबर २०११ ला शासन निर्णय काढून संबंधित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना आणि भविष्य निर्वाह निधी योजना लागू केली होती. मात्र दरम्यानच्या कालावधीत संबंधित शिक्षकांच्या वेतनातून अजून कपात रक्कम अजुनही शिक्षकांच्या नवीन भविष्य निर्वाह निधीत जमा करण्यात आलेली नाही, अशा प्रकारे शेकडो शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेली ही रक्कम कोट्यवधी रुपयांची आहे. ही रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वर्ग करुन कपात तारखेपासून व्याज मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. प्रशासकीय पातळीवर यंत्रणा उदासीन असल्याने कोणतीही कार्यवाही थंडबस्त्यात आहे. (प्रतिनिधी)