महापालिकेत कंत्राटदारांची बैठक
By Admin | Updated: June 25, 2015 00:17 IST2015-06-25T00:17:18+5:302015-06-25T00:17:18+5:30
बांधकाम कंत्राटदारांचे महापालिकेकडे थकीत असलेल्या २५ कोटी रुपयांच्या देयकांपैकी काही तरी पैसे द्या, तरच नवीन कामे करु, ...

महापालिकेत कंत्राटदारांची बैठक
अमरावती : बांधकाम कंत्राटदारांचे महापालिकेकडे थकीत असलेल्या २५ कोटी रुपयांच्या देयकांपैकी काही तरी पैसे द्या, तरच नवीन कामे करु, असा एकमुखी सूर कंत्राटदारांनी आवळला. मात्र, दर्जेदार कामे करा, पैसे मिळतील, असे म्हणत आयुक्तांनी कंत्राटदारांना दिलासा दिला. पैसे देण्यास उशीर झाल्यास एक टक्का व्याज देऊ, अशी हमी आयुक्तांनी दिली.
महापौर चरणजितकौर नंदा यांच्या अध्यक्षस्थानी कंत्राटदार, अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आयुक्त चंद्र्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, प्रभारी शहर अभियंता जीवन सदार आदी उपस्थित होते. दरम्यान कंत्राटदारांना एसीबीमार्फत चौकशी सुरु केली जाईल, अशी तंबी देण्यात आली. कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन कुचकामी ठरल्याप्रकरणी पदाधिकाऱ्याांनी सवाल उपस्थित केला. कंत्राटदारांची बाजू ऐकून घेताना देयके मिळणारच. केवळ दर्जेदार कामे करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. बांधकाम कंत्राटदारांनी थकीत रक्कमेचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. थकीत रक्कम मिळाल्याशिवाय नवीन कामे कशी करायची, असा प्रश्न कंत्राटदारांनी उपस्थित केला. परंतु कामे करायची नसेल तर पर्यायी यंत्रणा उभारु, असे आयुक्त गुडेवार म्हणाले. तेव्हा उपस्थित सर्वच कंत्राटदारांनी समर्थन देत बाहेरील कंत्राटदार आणूृन कामे करु शकता, काहीही हरकत नाही, अशी एकमुखी मागणी त्यांनी केली. सभागृहात तणाव निर्माण झाल्याचे लक्ष्यात येताच आयुक्तांनी संयम बाळगत कंत्राटदारांची बाजू ऐकून घेतली. जुन्या कामांचे थकीत देयके मिळतीलच. नवीन कामेदेखील दर्जेदार करा, असे म्हणत कंत्राटदारांना आपलेसे केले. मी कोणावरही अन्याय करीत नाही. मात्र फसवणूक, बदमाशी केली तर सोडणार नाही, असा समज आयुक्तांनी दिला.