कंत्राट संपला, इर्विनमध्ये पार्किंगसाठी अवैध वसुली
By Admin | Updated: October 3, 2015 00:06 IST2015-10-03T00:06:06+5:302015-10-03T00:06:06+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाहन पार्किंगचा कंत्राट संपल्यावरही अवैध वसुली सुरु आहे.

कंत्राट संपला, इर्विनमध्ये पार्किंगसाठी अवैध वसुली
वसुलीकर्त्यांची ‘दबंग’गिरी : दुचाकी चोरी, भांडण व वाद वाढले
लोकमत विशेष
वैभव बाबरेकर अमरावती
जिल्हा सामान्य रुग्णालयातील वाहन पार्किंगचा कंत्राट संपल्यावरही अवैध वसुली सुरु आहे. वसुलीदार दबंगगिरी करून वाहनाचालकांकडून पार्कींगचे पैसे वसुली करीत आहेत. त्यामुळे वादविवाद व दुचाकी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. मात्र, याकडे इर्विन प्रशासनाने दुर्लक्ष चालविल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात २४ तास रुग्णांची वर्दळ सुरु असते. रुग्णांचे नातेवाईक व अन्य काही नागरिक कामानिमीत्त वाहने घेऊन रुग्णालयात येतात. ती वाहने इर्विन परिसरातील पार्किंगमध्ये ठेवण्यात येते. त्याकरिता वाहनचालकांना ५ ते १० रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागतात. मात्र, गेल्या १० दिवसांपूर्वी पार्कीगचा कंत्राट संपल्यामुळे कोणत्याही वाहनधारकाला पैसे देण्याची गरज भासत नव्हती. पुढील कंत्राट दिल्यानंतर पुन्हा ‘पे अॅन्ड पार्किंग’ सुरु होणार आहे. मात्र आता ‘पे अॅन्ड पार्किंग नसतानाही काही जण अवैध वसूली करताना आढळून येत आहे. पार्कीगमध्ये वाहन लागताच अवैध वसुलीदार वाहनधारकांना पैसे मागतात. कोणतीही पावती न देता वाहनधारकांकडून पैसे उकळण्याचा फंडा काही जणांनी चालविला आहे. या अफलातून प्रकाराने अवैध वसुली करून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. एखाद्या वाहनधारकाने पार्किंगचे पैसे देण्यास नकार दिल्यास वादविवादसुध्दा होत आहे. पैसे न देणाऱ्यांना धमक्या देणे अथवा मारहाण करण्याचाही प्रकार सुरु आहे. मात्र, आतापर्यंत अवैध वसुली, वाद व मारहाणीची तक्रार करण्यास कोणीही पुढे आले नाहीत. इर्विन चौकीपर्यंत अनेकदा वाद व मारहाणीचे प्रकार जातात. मात्र, त्यावर दखल घेतली जात नाही. या अवैध वसुलीबाबत इर्विनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुध्दा माहिती आहे. मात्र, या प्रकाराला काहींची छुपी संमती आहे.
पार्किंगचे टेंडर मंजूर झाले असून कंत्राट देण्यात आला आहे. त्याकरिता नवीन कंत्रादाराला २० हजारांची रक्कम भरण्यासाठी सांगण्यात आले आहे. मात्र, त्याने अद्याप पैसे भरले नाही. लवकर पैसे भरण्यात आले नाही, तर दुसऱ्या व्यक्तीची निविदा मंजूर करण्यात येईल. शनिवारपर्यंत कंत्राट देण्याची प्रक्रिया पूर्ण करू
- अरुण राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक.