‘स्थायी’च्या टक्केवारीमुळे कंत्राटी वाहनचालक निविदा प्रक्रिया रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:33+5:302021-09-21T04:14:33+5:30
अमरावती : महापालिका स्थायी समितीला टक्केवारी न दिल्यामुळे कंत्राटी वाहनचालक पुरवठा निविदाप्रक्रिया रद्द करण्यात आल्याचा गौप्यस्फोट श्री योगिराज सुशिक्षित ...

‘स्थायी’च्या टक्केवारीमुळे कंत्राटी वाहनचालक निविदा प्रक्रिया रद्द
अमरावती : महापालिका स्थायी समितीला टक्केवारी न दिल्यामुळे कंत्राटी वाहनचालक पुरवठा निविदाप्रक्रिया रद्द करण्यात आल्याचा गौप्यस्फोट श्री योगिराज सुशिक्षित बेरोजगार नागरी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. स्थायी समितीत कोणताही विषय विनापैशाने मंजूर होत नाही, असा आरोप आहे.
सपकाळ यांच्या माहितीनुसार, महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या आक्षेपाअंती तिसऱ्यांदा कंत्राटी वाहनचालक निविदा प्रक्रियेत सुधारणा करून प्रस्ताव पाठविला. मात्र, काहीही झाले तरी श्री योगिराज बेरोजगार सेवा संस्थेला कंत्राटी वाहनचालक पुरवठा मिळू देणार नाही, अशी भूमिका स्थायी समितीने घेतल्याचे सपकाळ यांचे म्हणणे आहे. यापूर्वीसुद्धा कंत्राटी वाहनचालक पुरवठ्याला मुदतवाढ देण्यासाठी स्थायी समितीच्या नियमानुसार सर्व घडामोडी केल्या आहेत. मात्र, नव्याने निविदा प्रक्रियेनुसार कंत्राटी वाहनचालक पुरवठा मंजूर होणे आवश्यक आहे. परंतु ‘टक्केवारी द्या, काम घ्या’ असा अलीकडे स्थायी समितीचा कारभार सुरू झाल्याने सरळमार्गी कंत्राटदार, पुरवठादारांना कामे करणे कठीण झाले आहे. महापालिकेत ‘टक्केवारीराज’ बोकाळल्याने विकासकामांचा दर्जा घसरत चालल्याचा आरोप रवींद्र सपकाळ यांनी केला आहे. महापालिका इतिहासात पहिल्यांदाच प्रशासनाने तीनवेळा प्रस्ताव पाठवून तो अमान्य करण्यात आला आहे. टक्केवारी न दिल्याने कंत्राटी वाहनचालक पुरवठा प्रलंबित असल्याचा आक्षेप सपकाळ यांनी घेतला आहे.
-----------------
वाहनचालकांचे गत पाच महिन्यांपासून वेतन दिले नाही. महापालिका वाहन कार्यशाळा विभागातून अटी-शर्ती मॅनेज करून ठेवल्या आहेत. नव्या कामगार कायद्यानुसार चालकांची वेतनावाढ झाली आहे. तरी तो जुन्याच दराने वेतन करीत आहे. त्यामुळे निविदा पुन्हा राबविण्याचा निर्णय झाला. स्थायी समितीने योगिराजला पैसे मागितले असेल, तर पुरावे द्यावे, अन्यथा त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करू.
- सचिन रासने, सभापती स्थायी समिती.