वेतनवाढीसाठी कंत्राटी समन्वयकांची झेडपीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2017 00:16 IST2017-01-11T00:16:05+5:302017-01-11T00:16:05+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मेळघाटात कंत्राटी तत्त्वावर सन २००७ पासून समुपदेशकांची जबाबदारी सांभळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांपासून वेतनवाढ मिळाली नाही.

वेतनवाढीसाठी कंत्राटी समन्वयकांची झेडपीवर धडक
निवेदन : अतिरिक्त सीईओंसमोर मांडली व्यथा
अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मेळघाटात कंत्राटी तत्त्वावर सन २००७ पासून समुपदेशकांची जबाबदारी सांभळणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांपासून वेतनवाढ मिळाली नाही. त्यामुळे ही शासन धोरणानुसार वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी अतिरिक्त सीईओ प्रकाश तट्टे यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
मेळघाटमधील आदिवासी तथा सर्वसामान्य लोकांना, लहान मुलांना ० ते ६ वयोगट व त्यावरील बालक गर्भवती महिला, स्तनदा महिला यांना शासनाचा आरोग्य सेवा त्वरित मिळावी याकरिता कार्यरत असणारे समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. मात्र सन २००७ पासून आम्ही अद्यापपर्यंत या कर्मचाऱ्यांना एनआरएचएम, एनएचएमच्या कार्यक्रमांतर्गत सुरूवातीला देण्यात येणारे १० टक्के वाढ देण्यात आली नाही. याशिवाय आता ५ टक्के वाढसुद्धा देण्यात आली नाही. दरवर्षी इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे समुपदेशकाची जबाबदारी सांभाळणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वाढ देण्यात येत नाही. तसेच एनएचएमअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, येथील मेळघाट सेलमधील समन्वयक यांना दरवर्षी ३००० रुपये मोबाइल बिल मिळत होते. मात्र सदर बिलसुध्दा सन २०११ पासून मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याची दखल घेऊन शासनाने एनआरएचएम, एनएचएम अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना देण्यात आलेली वाढ व मोबाइलचे थकीत देयके त्वरित अदा करण्यात यावीत, अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदन देतेवेळी अविनाश ठवरे, प्रकाश खडके, शकुंतला कास्देकर, अलका झामरकर, हादू मुसूम, शारदा धांदे, नामदेव धांडे, कमल दारसिंबे, हरिलाल कास्देकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)