बदली आदेशाच्या अवमाननेची परंपरा !

By Admin | Updated: January 15, 2017 00:07 IST2017-01-15T00:07:30+5:302017-01-15T00:07:30+5:30

कार्यालयीन प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे, यासाठी नियमितपणे बदली प्रक्रिया राबविली जाते.

Contempt of the Order of Contempt! | बदली आदेशाच्या अवमाननेची परंपरा !

बदली आदेशाच्या अवमाननेची परंपरा !

बदली टाळण्यासाठी ऊर्जा खर्ची : महापालिकेत चुकीची पद्धत रुढ
अमरावती : कार्यालयीन प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे, यासाठी नियमितपणे बदली प्रक्रिया राबविली जाते. तथापि बदली झालेल्या ठिकाणी रुजू न होता ती बदली टाळण्यासाठीच जोरकस प्रयत्न केले जातात. प्रसंगी प्रशासनावर राजकीय दबाव आणला जातो. स्वास्थ्य कर्मचारी अरुण तिजारे हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी प्रशासकीय प्रमुखाच्या बदली आदेशाची अवमानना करण्याची पद्धतच महापालिकेत रुढ झाल्याचे सार्वत्रिक चित्र आहे.
महापालिकेत आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त आणि अपवादात्मक प्रसंगी उपायुक्त (प्रशासन) ही कर्मचाऱ्यांचे बदली आदेश काढतात. आदेश प्राप्त होताच संबंधितांनी त्वरित बदली झालेल्या विभागात रुजू होऊन तसा अहवाल सामान्य प्रशासन विभागात सादर करावा. त्याचप्रमाणे विभागप्रमुखांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे, असे आदेशित केले जाते. तथापि महापालिकेतील बहुतांश कर्मचारी या आदेशाला खो देतात.
विभागप्रमुख कार्यमुक्त करीत नाहीत, असे लंगडे समर्थन केले जाते. प्रत्यक्षात संबंधित कर्मचाऱ्याकडूनच सोईचा टेबल सुटत नाही.
सामान्य प्रशासन विभागाकडूनही त्याबाबत विचारणा किवा पाठपुरावा केला जात नाही. आणि काही कालावधीनंतर तो कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू न होता आहे. त्याच ठिकाणी स्थिरावतो.आयुक्त किंवा अन्य प्रशासकीय उच्चपदस्थांच्या आदेशाची राजरोसपणे अवमानना केली जाते. शिस्तीचा भंग होतो.
शिस्तभंग कारवाई मात्र होत नाही. त्यामुळेच बदली आदेशाला खो देत कर्मचाऱ्यांमध्ये चुकीच्या परंपरेचे पाईक होण्याची जणू अहमहमिका लागली असावी,असे चित्र अनुभवायास मिळत आहे. (प्रतिनिधी)

आयुक्तांचा लक्षवेध
आयुक्त हेमंत पवार हे पारदर्शी कारभारासाठी ओळखले जातात.मात्र त्यांच्या बदली आदेशाला हरताळ फासण्याचे धाडस कर्मचारी दाखवत असल्याचे विदारक वास्तव आहे.आयुक्तांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेले बदली आदेश आणि प्रत्य़क्षात बदलीस्थळी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण पाहिले तर प्रशासकीय अवमाननेचा टक्काच अधिक असल्याची नकारात्मक वस्तुस्थिती आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाचीही पायमल्ली केली जाते.बदलीस्थळी रुजू न होता आहे त्याच ठिकाणी आपले अनेक सहकारी काम करतात,हे पाहल्यांतर अनेकजण आपलेच काय होणार?अशी सोईस्कर भुमिका घेत बदली आदेश टाळतात.

Web Title: Contempt of the Order of Contempt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.