निर्माल्य टाकण्यासाठी महापालिका बसविणार कंटेनर
By Admin | Updated: September 8, 2016 00:24 IST2016-09-08T00:24:28+5:302016-09-08T00:24:28+5:30
अंबानगरीत घराघरांत सोमवारी गणरायाचे वाजत-गाजत आगमन झाले.

निर्माल्य टाकण्यासाठी महापालिका बसविणार कंटेनर
सामाजिक उपक्रम : विसर्जनाच्या ठिकाणीही करण्यात येणार व्यवस्था
अमरावती : अंबानगरीत घराघरांत सोमवारी गणरायाचे वाजत-गाजत आगमन झाले. हिंदू संस्कृतीत अतिशय श्रद्धेने गणरायाची पूजा-अर्चना केली जाते. या पूजेसाठी लागणारी फुले, दुर्वा, व इतर निर्माल्य टाकण्यासाठी महापालिकेच्यावतीने ठिकठिकाणी कंटेनर व निर्माल्य कलश ठेवण्यात येणार आहेत.
शहरातील गणेश विर्सजन ज्याठिकाणी करण्यात येणार आहे. त्या छत्री तलाव, वडाळी तलाव याठिकाणी निर्माल्यासंदर्भात नियोजन करण्यात येणार असून काही कृत्रिम तलाव सुद्धा तयार करण्यात येणार आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून पर्यावरण निमुुर्लन करण्यासाठी काही सामाजिक संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे. स्वच्छता ठेवण्याच्या अनुषंगाने याकरीता गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून निर्माल्यातून खतनिर्मिती करण्याचाही महापालिकेचा मानस आहे. तसेच निर्माल्यासोबत काही वेस्टज मटेरियल येत असेल तर ते वेगळे काढण्यात येईल व उर्वरीत फुले, दुर्वा व इतर पूजा साहित्यातून खत निर्मिती करण्यात येणार आहे.
यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग व बांधकाम विभाग कामाला लागला आहे. पर्यावरण विभागाचेही या उत्सवावर विशेष लक्ष राहणार आहे. (प्रतिनिधी)
निर्माल्य कंटेनर मध्येच टाकावे?
गणरायांच्या उत्साहात कुठलीही गैरसोय होऊ नये, याकरिता महापालिका सज्ज झाली आहे. वरिष्ठांची बैठकही यासंदर्भात पार पडली. महापालिकेच्यावतीने काही ठिकाणी अधिकृतरित्या निर्माल्य टाकण्यासाठी कंटेनर लावण्यात येणार असून काही सामाजिक संघटनांचा सहभाग घेऊन निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचे विचाराधीन आहे. त्याकरीता नागरिकांनी अधिकृत कंटेनरमध्येच निर्माल्य टाकावे, असे आवाहन करण्यात येणार आहे.
पर्यावरण निमुर्लनासाठी निर्माल्यापासून खत निर्मीती करण्याचा मानस आहे. त्यासाठी काही सामाजिक संघटनांची मदत घेण्यात येणार आहे.
- महेश देशमुख
पर्यावरण विभाग महापालिका