बांधकाम कामगारांचा जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा
By Admin | Updated: April 30, 2015 00:21 IST2015-04-30T00:21:26+5:302015-04-30T00:21:26+5:30
असंघटित बांधकाम कामगारांना शासनाकडून सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नाही. सोबतच हाताला पुरेसे काम मिळत नाही.

बांधकाम कामगारांचा जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा
मागणी : आयटकचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : असंघटित बांधकाम कामगारांना शासनाकडून सुरक्षेच्या कोणत्याही सुविधा नाही. सोबतच हाताला पुरेसे काम मिळत नाही. त्यामुळे असंघटित कामगारांना शासनाने आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी बुधवारी महाराष्ट्र असंघटित बांधकाम कामगार संघटना (आयटक) च्यावतीने सायन्सस्कोर मैदानातून जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, नोंदणी करणारी सध्याची व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र्य कार्यालय सुरू करावे, यासाठी आवश्यक तो कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा, बांधकाम कामगारांसाठी कल्याण मंडळाच्या सर्व योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, गृहपयोगी वस्तू व अवजारे खरेदी करण्यासाठी सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांस १० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, कामगारांना २ लाख रूपये विम्याचा बॉन्ड देण्यात यावा व आरोग्य विम्याचे स्वतंत्र कार्ड देण्यात यावे. ज्या विमा कंपन्यांकडे मंडळाने २४ कोटी रूपये रक्कम विम्याच्या हप्त्यापोटी भरली त्यांना ही रक्कम देण्यास बाध्य करावे आदींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी निवेदन स्वीकारुन आयटकच्या शिष्टमंडळाला मागण्या शासन दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी तुकाराम भस्मे, संजय मंडवधरे, जे.एन कोठारी, संजय भालेराव, नयन गायकवाड सचिन गवई, शे.सईद शे.हमजा, गजानन भगत, प्रभाकर शिंदे, अनिल बिटले, हारूण ठेकेदार, चंपत कोहळे, मनोज मुळे आदी उपस्थित होते.