बटाऊवाले कुटुंबीयांची पालकमंत्र्यांकडून सांत्वना
By Admin | Updated: August 26, 2015 00:10 IST2015-08-26T00:10:00+5:302015-08-26T00:10:00+5:30
अमित बटाऊवाले याच्या हत्येनंतर तब्बल १३ दिवसांनी सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अमितच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

बटाऊवाले कुटुंबीयांची पालकमंत्र्यांकडून सांत्वना
आरोपींवर मोक्का लावा : बारूद गँगच्या सदस्यांची दादागिरी
अमरावती / अचलपूर : अमित बटाऊवाले याच्या हत्येनंतर तब्बल १३ दिवसांनी सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अमितच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. याबाबत २३ आॅगस्ट रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी ही भेट दिली. परंतु अजूनही खा. आनंदराव अडसूळ अचलपुरात पोहोचले नसल्याची चर्चा जनतेत आहे.
रेती तस्करांनी अमित बटाऊवाले याचा दिवसाढवळ्या हत्या केली. या घटनेला १३ दिवसांपर्यत पालकमंत्री किंवा खासदारांनी अचलपूर येथे बटाउवाले यांच्या घरी भेट दिली नव्हती. ‘लोकमत’ने याबद्दल २३ आॅगस्ट रोजी 'लोकप्रतिनिधींचे हेच का कर्तव्य' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांत खळबळ उडाली होती. वृत्ताची दखल घेत पालकमंत्री पोटे यांनी सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बटाऊवाले कुटुंबीयांची भेट घेतली, असे भाजपच्या एका कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान बारूद गँगच्या नावाचा फायदा काही लोक घेत असल्याचे उघडकीस आले आहे.
यावेळी वाळू तस्करीकडे दुर्लक्ष करणाऱ्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदारावर कारवाई करावी, सर्व आरोपींना विनाविलंब अटक करावी, त्यांचेवर मोक्का लावावा, उपजिल्हा रुग्णालयाने केलेली वैद्यकीय चाचणी संशयास्पद आहे, याची चौकशी करावी आदी मागण्या अमितची आई अनिता मोहन बटाउवाले यांचेसह नातेवाईकांनी केल्यात. मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे दिले.
भेटीदरम्यान अचलपूर येथील नगरपरिषदेचे नगरसेवक अभय माथने, माजी नगरसेवक माणिक देशपांडे, धर्मा राऊत, आशिष सहारे (पथ्रोट), नगरसेवक पवन बुंदेले, मनीष लाडोळे, ओमप्रकाश दीक्षित आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
बारूद गँगचा सदस्य
मंजूरपुऱ्यातील रहिवासी शे. अजीज शे. हबीब यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज पाठविला आहे. त्यामध्ये अमरावती येथील सुभान पहेलवान हे बारूद गटाचे असून ते अचलपूर येथे येऊन दादागिरी करतात. या पहेलवानाने मला ५ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता तलवारीने मारून जखमी केले. यासंदर्भात सरमसपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माझ्या घराशेजारी काही लोकांनी शेणखत टाकून घाण केल्याने मी पोलीस ठाण्यात व नगरपरिषदेत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे सुभान पहेलवान जीवे मारण्याच्या धमक्या देतात, असे नमूद आहे. सुभान पहेलवान हा बारूद गँगचा सदस्य आहे, हे विशेष.