दीक्षांत समारंभाच्या आयोजनावर ‘मॅनेजमेंट’मध्ये शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST2021-02-13T04:14:46+5:302021-02-13T04:14:46+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन होईल, तर २२, २३ व ...

दीक्षांत समारंभाच्या आयोजनावर ‘मॅनेजमेंट’मध्ये शिक्कामोर्तब
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७ वा दीक्षांत समारंभ २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन होईल, तर २२, २३ व २४ फेब्रुवारी असे तीन दिवस आचार्य पदवी संशोधकांना पदवीचे वितरण केले जाईल. आता दीक्षांत समारंभाच्या तारखेत कोणताही बदल होणार नाही, असा निर्णय व्यवस्थापन परिषदेने गुरुवारी घेतला.
दीक्षांत समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थानी तर, केंद्रीय भूपृष्ठ दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या के.व्ही. देशमुख सभागृहात दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. गडकरी हे विद्यापीठात ऑफलाइन उपस्थित राहतील, असे त्यांनी कळविले आहे. राज्यपाल कोश्यारी हे दीक्षांत समारंभाला ऑनलाइन उपस्थित राहून संबाेधित करतील. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीक्षांत समारंभाला अनावश्यक गर्दी होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. परिणामी मंचावर मान्यवरांसह कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक, अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य एकूण २५ जण उपस्थित राहतील, अशी आसन व्यवस्था असणार आहे. दीक्षांत समारंभात केवळ २७१ आचार्य पदवीधारकांना पदवी वितरण केली जाणार आहे.
---------------------
दीक्षांत समारंभात आचार्य पदवी वितरण
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा- १२६
मानव विज्ञान विद्याशाखा- ८७
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा- १९
आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा- ५२
-----------
कोट
व्यवस्थापन परिषदेत झालेल्या निर्णयानुसार दीक्षांत समारंभाची तयारी सुरू आहे. पाहुण्यांची तारीख, वेळ ठरली आहे. समारंभात आचार्य पदवीधारकांना पदवी प्रदान केली जाणार आहे. कोरोना नियमांचे कोटेकोरपणे पालन करूनच हा समारंभ होईल.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ